बातम्या

कायद्यात राहाल, तर फायद्यात राहाल” – अधीक्षक योगेशकुमार यांचा कडक इशारा!

Superintendent Yogesh Kumars stern warning


By nisha patil - 10/13/2025 11:52:26 AM
Share This News:



कोल्हापूर : कायद्याचे रक्षण करून सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस दलातील काही पोलिसच कायद्याचे भक्षक बनल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र, पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांनी अशा पोलिसांवर कठोर कारवाईला सुरुवात केली असून, “गैरकृत्य करणाऱ्यांची गय होणार नाही” असा कडक संदेश दिला आहे.

अवैध व्यावसायिकांना पाठीशी घालणे, आरोपींना मदत करणे, खंडणी उकळणे अशा गंभीर गैरप्रकारांनंतर आता बनावट नोटांच्या रॅकेटमध्येही पोलिसांचा सहभाग उघड झाला आहे. या प्रकरणात हवालदार इब्रार इनामदार याचा मुख्य सूत्रधार म्हणून सहभाग स्पष्ट झाल्याने, अधीक्षकांनी त्याला विनाचौकशी थेट बडतर्फ केले. या कारवाईने दलात खळबळ उडाली आहे.

गत काही महिन्यांपासून जिल्हा पोलिस दलात गैरकृत्यांची मालिका सुरू आहे. आंतरजिल्हा बदलीसाठी खंडणी उकळणाऱ्या आस्थापना विभागातील हेडक्लार्क आणि मध्यस्थी करणाऱ्या महिला पोलिसांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या टोळीवरील मोक्का कारवाई रद्द करण्याचे आमिष दाखवून ६५ लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीत मुख्यालयातील सहायक फौजदार मिलिंद नलावडे याचा सहभाग स्पष्ट झाला आहे.

दरम्यान, मागणीसाठी आलेल्या महिलेच्या असहायतेचा गैरफायदा घेतल्याप्रकरणी हवालदार सुनील कुंभार याच्यावर गुन्हा दाखल झाला. सलग घडलेल्या या घटनांमुळे पोलिस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.

अधीक्षक योगेशकुमार यांनी याआधी बदलीसाठी पैसे घेणाऱ्या पोलिसांवर खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित केले होते. आता इनामदार याला बडतर्फ करून त्यांनी स्पष्ट संदेश दिला आहे की,

“कायद्यात राहाल, तर फायद्यात राहाल.”

जिल्हा पोलिस दलात अजूनही काही छुपे मोहरे कार्यरत असल्याची चर्चा सुरू असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कायद्याचे भक्षक बनलेल्यांना ‘खड्यासारखे बाजूला काढण्याची’ गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.


कायद्यात राहाल, तर फायद्यात राहाल” – अधीक्षक योगेशकुमार यांचा कडक इशारा!
Total Views: 62