विशेष बातम्या
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला आजऱ्यातून पाठिंबा
By nisha patil - 10/30/2025 4:18:11 PM
Share This News:
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला आजऱ्यातून पाठिंबा
आजरा(हसन तकीलदार):-महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना पावसाने मारले आहे. जवळपास सहा महिने झाले पावसाने झोडपण्याचे काम केले आहे. हातातोंडाला आलेल्या पिकांची पावसामुळे कापणी मळणी करता येत नाहीत. वर्षभर राबलेल्या शेतकऱ्यांना पीक कापून घरात धान्य आणणे मुश्किलीचे झाले आहे. त्यातच हत्ती, गवे, रान डुकरे, माकडे यासारखी वन्य प्राणी पिकांची नासधूस करीत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीसहित अन्य मागण्या घेऊन नागपूर येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आजरा तालुका शेतकरी कृती समितीने आजरा तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
शेतकरी नैसर्गिक आपत्तीच्या संकटात सापडलेला आहे. सरकारने निवडणूकीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचा उल्लेख केला होता. परंतु सत्तेत आल्यानंतर याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी तसेच इतर मागण्यासाठी नागपूर येथे आमदार बच्चु कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी व अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या आंदोलनाला आजरा तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन आजरा तहसीलदार यांना देण्यात आले आहे. महापूर, अतिवृष्टी, हमीभावाचा आभाव यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी संपूर्ण कर्जमाफीची गरज आहे. शासनाने तात्काळ कर्ज माफी करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई आणि कॉ. शिवाजी गुरव यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. निवेदनावर संजय तर्डेकर, संभाजी पाटील (उबाठा), युवराज पोवार (उबाठा), शिवाजी इंगळे, संजय देसाई, सुरेश पाटील, सखाराम केसरकर, निवृत्ती कांबळे, प्रकाश देसाई, शामराव नार्वेकर, अर्जुन तुप्पट, सुरेश शिंगटे, मारुती चव्हाण, काशिनाथ भादवणकर, परशुराम आपगे, बबन बारदेस्कर आदींच्या सह्या आहेत.
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला आजऱ्यातून पाठिंबा
|