बातम्या
मुंबई येथे सुरु असलेल्या शाळा बचाव आंदोलनास आजऱ्यातून पाठिंबा
By nisha patil - 7/10/2026 11:03:04 PM
Share This News:
मुंबई येथे सुरु असलेल्या शाळा बचाव आंदोलनास आजऱ्यातून पाठिंबा
*प्राथमिक शाळांच्या अस्तित्वाचे व ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे संरक्षण करण्याबाबतचे आजरा तहसीलदारांना निवेदन
*आजरा(हसन तकीलदार):-आजरा तालुक्यातील कष्टकरी जनता, शाळा व्यवस्थापन समित्यांचे पदाधिकारी, पालक आणि वाड्या वास्त्यावरील ग्रामस्थ यांच्यावतीने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या अस्तित्वाचे व ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे संरक्षण करण्याबाबतचे निवेदन आजरा तहसीलदार यांना देण्यात आले त्याचप्रमाणे मुंबई येथील सुरु असलेल्या सरकारी शाळा बचाव आंदोलनास यावेळी पाठिंबा देण्यात आला.
शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार घालून अभिवादन करून मोर्चाला सुरवात झाली. शाळा बचावच्या घोषणा देत तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाऊन याठिकाणी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी कॉ. संजय तर्डेकर म्हणाले की, आझाद मैदानात प्रमुख पाच मागण्या घेऊन बेमुदत आंदोलन सुरु आहे. कष्टकऱ्यांच्या शाळा बंद पाडण्याचा सरकारचा डाव आहे. शिक्षणाचा हक्क घटनेने दिलेला आहे आणि हा अधिकार आम्ही सोडणार नाही. सावित्री बाई आणि फुलेंच्या मुळेच आणि त्यानंतर शाहूंच्यामुळे खऱ्या अर्थाने शिक्षणाची गंगोत्री गावागावात फिरली स्त्रियांना शिकण्याचा अधिकार मिळाला. आताच्या सरकारचे धोरण म्हणजे ग्रामीण भागातील गावागावातील सरकारी शाळा बंद पाडण्याचा डाव आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडल्या तर पहिला घाला पडणार तो मुलींच्या शिक्षणावर. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळा टिकल्या पाहिजे.
आजरा साखर कारखान्याचे संचालक हरिभाऊ कांबळे म्हणाले की, ग्रामीण भागातील शाळा बंद करायच्या आणि आमदार, खासदारांच्या शाळा सुरु करून गरिबांनी डोनेशन भरून महागडे शिक्षण घ्यायचे काय? बारा बलुतेदारांना हे महागडे शिक्षण घेता येणार नाही. गोरगरीब,कष्टकऱ्यांची मुले मुली शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. निवडून दिलेल्या आमदार, खासदारांना गरिबांचे शिक्षण हिरावून तू का घेतलास आणि आमच्या गरिबांच्या मुलांनी शिकायचं कुठं? असा जाब विचारला पाहिजे असे सांगितले.
स्वाभिमानीचे तालुका उपाध्यक्ष संजय देसाई म्हणाले की, आमच्या पूर्वजानी देवळात भरणाऱ्या शाळासाठी स्वतःची जागा दिली, शाळेसाठी रस्ते दिले आणि शाळा सुरु केल्या. आपली मुलं शिकावी हीच त्यांची निखळ इच्छा होती. त्यांनी सुरु केलेल्या शाळा आता हे सरकार बंद पाडत आहे. आपल्याच देशातील तामिळनाडू राज्यात तेथील मुख्यमंत्री विजय थलपती खाजगी शाळा बंद करून सरकारी शाळा सुरु करीत आहे आणि सरकारी शाळेत शिक्षण घेणाऱ्यांनाच सरकारी नोकरी देण्याची घोषणा करत आहे मग महाराष्ट्र सरकार सरकारी शाळा बंद पाडून खाजगीकरण का करीत आहे?
यावेळी अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली. आणि निवेदन तहसीलदार यांना दिले. यावेळी कॉ. प्रकाश मोरूस्कर, दशरथ घुरे, डॉ. धनाजी राणे, हिंदुराव कांबळे, कॉ. संजय घाटगे, कॉ. काशिनाथ मोरे, सुभाष विभुते, बळवंत शिंत्रे, दत्ता कांबळे, परशुराम गुंडप, विजय गुरव,विष्णू जाधव यांच्यासह महिला वर्ग तसेच गावागावातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई येथे सुरु असलेल्या शाळा बचाव आंदोलनास आजऱ्यातून पाठिंबा
|