बातम्या
किणी टोल नाका आंदोलनानंतर शिल्लक राहिलेले अन्नधान्य सामाजिक संस्थांना सुपूर्द; राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्तुत्य उपक्रम.
By nisha patil - 11/11/2026 5:27:27 PM
Share This News:
किणी टोल नाका आंदोलनानंतर शिल्लक राहिलेले अन्नधान्य सामाजिक संस्थांना सुपूर्द; राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्तुत्य उपक्रम.
कुंभोज :( प्रतिनिधी) "शेतकरी चळवळीत कधीच कोणाची झोळी रिकामी राहिली नाही," याचा प्रत्यय नुकत्याच पार पडलेल्या ऊस दर आंदोलनात पुन्हा एकदा आला आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाका येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ऊस दराच्या न्याय्य मागणीसाठी तब्बल ६१ तास महामार्ग रोखो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर शिल्लक राहिलेले अन्नधान्य आणि जीवनावश्यक साहित्य आज विविध सामाजिक संस्थांना सुपूर्द करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
स्वतःच्या घामाच्या दामासाठी शेतकरी रस्त्यावर उतरला होता. महामार्ग रोखल्यानंतर कारखानदार आणि राज्य सरकार तात्काळ मार्ग काढतील, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना तब्बल तीन दिवस आणि तीन रात्री डांबरी रस्त्यावर झोपून आंदोलन करावे लागले.
या कठीण काळात परिसरातील गावागावांतून शेतकऱ्यांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला. ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर भाकऱ्या, तांदूळ, केळी आणि भाजीपाला आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचता केला. या ६१ तासांच्या आंदोलनात तब्बल ३८ हजार आंदोलक शेतकऱ्यांनी भोजन केले, तरीही अन्नाचा तुटवडा भासला नाही.
आंदोलन यशस्वी झाल्यानंतर, नागरिकांनी दिलेल्या मदतीमधून मोठ्या प्रमाणावर तांदूळ, खाद्यतेल, डाळी आणि मसाले पदार्थ शिल्लक राहिले होते. राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे सर्व शिल्लक साहित्य 'सहारा अपंग पुनर्वसन केंद्र, नेज' आणि 'साधकाश्रम, कुंभोज' या संस्थांकडे सुपूर्द केले.
ऐन दिवाळीत माणुसकीचे दर्शन
या उपक्रमाबद्दल बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या अहोरात्र कष्टामुळे शेतकऱ्यांना ऊस दराचा न्याय तर मिळालाच, पण या आंदोलनाच्या निमित्ताने ऐन दिवाळीत गरजू आणि दिव्यांग बांधवांना मदत करता आली, याचे मोठे समाधान आहे. शेतकरी चळवळ ही केवळ हक्कासाठी लढणारी चळवळ नसून, ती समाजातील वंचित घटकांच्या पाठीशी उभी राहणारी चळवळ असल्याचे या कृतीतून सिद्ध झाले आहे.
किणी टोल नाका आंदोलनानंतर शिल्लक राहिलेले अन्नधान्य सामाजिक संस्थांना सुपूर्द; राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्तुत्य उपक्रम.
|