बातम्या
सैनिक टाकळी एमआयडीसीप्रकरणी चुकीचा अहवाल देणाऱ्या बीडीओंना निलंबितकरा
By nisha patil - 9/15/2026 9:09:04 PM
Share This News:
सैनिक टाकळी एमआयडीसीप्रकरणी चुकीचा अहवाल देणाऱ्या बीडीओंना निलंबितकरा
माजी सैनिकांसह शेतकऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन
शिरोळ : प्रस्तावित सैनिक टाकळी एमआयडीसीच्या ग्रामसभेच्या ठरावाची सत्यता पडताळणी करण्याच्या प्रकरणात चुकीचा अहवाल सादर करणाऱ्या शिरोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. परिट यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
दि. १८ ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिस्तरीय बैठकीत ग्रामसभेच्या ठरावाची सत्यता पडताळून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना देण्यात आले होते. त्यानुसार टाकळी ग्रामसेवकांनी केलेल्या चौकशीत एमआयडीसी मंजुरीचा ठराव झालेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.
तसेच संबंधित प्रोसिडिंग उताऱ्यावर दिनांक व जावक क्रमांक नसणे, २९ नोव्हेंबर २०२३ रोजी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करण्यात आले नसणे आदी त्रुटी निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सदर ठरावाची वैधता संशयास्पद असताना गटविकास अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने अहवाल तयार करून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडे पाठविल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
या अहवालामध्ये तत्कालीन सरपंचांचे मतही घेण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला. ग्रामसेवकांनी संपूर्ण ग्रामसभेची चौकशी करून रीतसर अहवाल दिलेला असतानाही अधिकाराचा गैरवापर करून दबावापोटी अहवाल बदलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना जाब विचारून सदर चुकीचा अहवाल तातडीने मागे घ्यावा, फेरचौकशी करून नव्याने अहवाल तयार करावा आणि चुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी लेखी मागणी करण्यात आली.
मागण्या मान्य न झाल्यास सैनिक टाकळी परिसरातील माजी सैनिक, शेतकरी व नागरिकांच्या सहभागाने जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुरमुंगे, जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, राकेश जगदाळे, टाकळीच्या माजी सरपंच हर्षदा पाटील, विनोद पाटील, नवनाथ पाटील, गोपाल चव्हाण आदी उपस्थित होते.
सैनिक टाकळी एमआयडीसीप्रकरणी चुकीचा अहवाल देणाऱ्या बीडीओंना निलंबितकरा
|