बातम्या
शिरोळ तालुक्यात अमली पदार्थांचा विळखा वाढला; समूळ उच्चाटनाची स्वाभिमानीची मागणी
By nisha patil - 5/28/2026 4:04:24 PM
Share This News:
शिरोळ तालुक्यात अमली पदार्थांचा विळखा वाढला; समूळ उच्चाटनाची स्वाभिमानीची मागणी
जयसिंगपूर (प्रतिनिधी) शिरोळ तालुक्यातील तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत असून त्यामुळे तालुक्यातील गुन्हेगारी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. गांजा, भांग, चरस, हेरॉईन, ब्राऊन शुगर, मेथाम्फेटामाइन, अफू आणि कोकेन यांसारख्या अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याची मागणी स्वाभिमानी पक्षाने जयसिंगपूर येथील पोलिस उपअधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली.
शिरोळ तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये, तरुण मंडळे तसेच औद्योगिक वसाहती परिसरात अमली पदार्थ विक्रीचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप करण्यात आला. विशेषतः परप्रांतीय तरुणांच्या माध्यमातून हा व्यवसाय वाढत असून शहरांनंतर आता ग्रामीण भागातील तरुण-तरुणींनाही व्यसनाच्या गर्तेत ओढले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
अमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळ्यांची माहिती पोलिस यंत्रणेला असूनही कारवाई होत नसल्याचा आरोपही स्वाभिमानी पक्षाने केला. अवैध दारू आणि मटका व्यवसायाच्या ठिकाणीही अमली पदार्थांची विक्री सुरू असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे १५ ते १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलांमध्येही या व्यसनाचे प्रमाण वाढत असून प्रत्येक गावातील अनेक तरुण त्याचे बळी ठरत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.
तालुक्यात वाढत असलेल्या खून, चोरी, दरोडे, अपहरण, गँगवार तसेच विविध शर्यतींमध्ये अमली पदार्थांच्या सेवनातून होणारे वाद यामागे या व्यसनाचा मोठा संबंध असल्याचा आरोप करण्यात आला. शेजारच्या सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी होत असून, मोका कायद्यांतर्गत हद्दपार असलेल्या काही गुन्हेगारांनी जयसिंगपूर परिसरात आपले जाळे निर्माण केल्याचा दावाही करण्यात आला.
या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी पक्षाने केली आहे.
यावेळी स्वाभिमानी पक्षाचे शहराध्यक्ष शंकर नाळे, युवा आघाडीचे शहराध्यक्ष नेमिनाथ मादनाईक, वासू भोजणे, प्रितम पाटील, पार्श्वनाथ मोटके, अभय भिलवडे, किरण पाटील, सतिश कोळेकर, सोनू मादनाईक, संजय मादनाईक, बिपिन आवटी, पारस जंगले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
शिरोळ तालुक्यात अमली पदार्थांचा विळखा वाढला; समूळ उच्चाटनाची स्वाभिमानीची मागणी
|