विशेष बातम्या
कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एल्गार; १५ दिवसांत एफ.आर.पी. जमा करा, अन्यथा कारवाईचा इशारा!
By nisha patil - 9/6/2025 4:48:18 PM
Share This News:
कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एल्गार; १५ दिवसांत एफ.आर.पी. जमा करा, अन्यथा कारवाईचा इशारा!
कोल्हापूर (प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्ह्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल १३५ कोटी रुपयांची थकीत एफ.आर.पी. (व्याजासह) येत्या १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी जोरदार मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली. याबाबत संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली.
राज्य सरकारच्या निर्णयामुळे कारखानदार शेतकऱ्यांना दोन-तीन टप्यांत एफ.आर.पी. अदा करत असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर त्यांचा हक्काचा पैसा मिळत नाही. या प्रकारामुळे कोल्हापूर विभागात तब्बल १३५ कोटी रुपयांची एफ.आर.पी. थकीत आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.
त्याचबरोबर जिल्ह्यात युरिया व अन्य खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून लिंकींगचा धंदा राजरोसपणे सुरू असल्याचा आरोप करत, बोगस व लिंकींग खत विक्री करणाऱ्या कंपन्यांवर थेट गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही स्वाभिमानीतर्फे करण्यात आली. कृषी विभाग व खत कंपन्यांमध्ये आर्थिक साठगाठ असून, केवळ किरकोळ विक्रेत्यांवरच कारवाई करून मूळ गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू असल्याची टीका यावेळी झाली.
या मागण्यांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही सकारात्मक भूमिका घेत पुढील आठवडाभरात एफ.आर.पी. थकीत रक्कम न दिल्यास आर.आर.सी.द्वारे वसुली करण्याचा इशारा दिला. तसेच बोगस व लिंकींग खत विक्रीबाबत जिल्हाधिकारी आणि कृषी अधिक्षकांना तत्काळ पथक तयार करून धाडी टाकण्याचे आदेश दिले. लिंकींग सक्ती करणाऱ्या कंपन्यांवर थेट कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार, धनाजी पाटील, बाळासाहेब पाटील, राजाराम देसाई, सचिन शिंदे, संपत पवार, बंडू पाटील, सुधीर मगदूम, तानाजी वठारे, विशाल चौगुले, आण्णा मगदूम, आप्पा एडके, विक्रम पाटील, विजय कर्वे, विवेक चौगुले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एल्गार; १५ दिवसांत एफ.आर.पी. जमा करा, अन्यथा कारवाईचा इशारा!
|