ताज्या बातम्या
दत्त साखर कारखान्याचा एफ.आर.पी. पेक्षा १०० रुपये जादा दर; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध
By nisha patil - 6/11/2025 2:10:37 PM
Share This News:
जयसिंगपूर: दत्त साखर कारखान्याने चालू गळीत हंगामासाठी एफ.आर.पी. पेक्षा १०० रुपये अधिक म्हणजे एकूण ३४७७ रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी ३४०० रुपये एकरकमी तर उर्वरित ७७ रुपये हंगामानंतर देण्याचे ठरवले आहे. मात्र, या निर्णयावर स्वाभिमानी शेतकरी संघटना असमाधानी असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी सांगितले.
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आज जयसिंगपूर येथील जनसंपर्क कार्यालयात संघटनेची बैठक झाली. कर्नाटक सीमाभाग, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात असून जादा दर मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याच पार्श्वभूमीवर कारखानदारांकडून दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारमाध्यमांतून पसरवल्या जात आहेत, असा आरोप मोरे यांनी केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दत्त कारखान्याने जाहीर केलेला दर मान्य केलेला नाही, असे स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी होऊन जादा दर देणाऱ्या कारखान्यांना ऊस देण्याबाबत ठाम राहावे, असे आवाहन करण्यात आले.
कर्नाटक राज्यातील कारखानदार ११ टक्के रिकव्हरी असलेल्या ऊसाला ३२०० ते ३३०० रुपये दर देत आहेत. त्यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी एकत्र येऊन गट्टी केली असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला. शेतकऱ्यांनी खोट्या अफवांना बळी न पडता तोडी बंद ठेवावी, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
विठ्ठल मोरे म्हणाले, “यंदा शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल, याची खात्री आहे. कारखानदारांचे काही बगलबच्चे ३४०० रुपयांचा दर मान्य असल्याचे निवेदन देत आहेत. परंतु, हा दर शेतकऱ्यांच्या हिताचा नाही.”
सन २०२२-२३ च्या हंगामात फक्त आठ दिवस हंगाम वाढला, पण संघटनांच्या आंदोलनामुळे ऊस तोड मजुरांना ५ हजार रुपये मजुरी देण्याची वेळ कारखान्यांवर आली होती, असे त्यांनी सांगितले.
या बैठकीस युवा जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे, तालुकाध्यक्ष तानाजी वठारे, विशाल चौगुले, राम शिंदे, अजित दानोळे, श्रीकांत पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, विक्रम पाटील, कुमार सुतार, बाळू माणकापूरे, विजय कर्वे, बंडू पाटील, कलगोंडा खंजिरे यांच्यासह शिरोळ तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
दत्त साखर कारखान्याचा एफ.आर.पी. पेक्षा १०० रुपये जादा दर; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध
|