बातम्या
स्वामी प्रतिष्ठान कोवाडेतर्फे दीपावलीनिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम उत्साहात संपन्न
By nisha patil - 10/11/2026 3:46:06 PM
Share This News:
स्वामी प्रतिष्ठान कोवाडेतर्फे दीपावलीनिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम उत्साहात संपन्न
- अजित बोडके, कोल्हापूर प्रतिनिधी कोवाडे : स्वामी प्रतिष्ठान, कोवाडे यांच्या वतीने दीपावलीचे औचित्य साधून गावात विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये युवा व जनजागृती कार्यक्रम, महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, शिवप्रेमींसाठी स्वराज्य गड-किल्ले बांधणी स्पर्धा तसेच कोवाडे-दाभेवाडी परिसरातील निराधार महिला व पुरुषांना फराळ वाटप अशा उपक्रमांचा समावेश होता.
दिनांक ९ नोव्हेंबर रोजी आयोजित युवा व जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वैशाली वडवळेकर मॅडम, रविंद्र गुडगुळेकर सर, नंदकुमार देसाई गुरुजी, गुरुदेव साबळे गुरुजी व सुरेश देशमुख गुरुजी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास होरटे गुरुजी यांनी केले.
यावेळी गुरुदेव साबळे गुरुजी व नंदकुमार देसाई गुरुजी यांनी शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव मांडत विद्यार्थ्यांना शिक्षणातील बदलत्या संधी व आव्हानांबाबत मार्गदर्शन केले. रविंद्र गुडगुळेकर सर यांनी युवकांना नोकरीच्या संधी, व्यवसायातील आव्हाने, उद्योजकता, जिद्द आणि योग्य मित्रपरिवाराचे महत्त्व पटवून दिले. तर मुख्य वक्त्या वैशाली वडवळेकर मॅडम यांनी शिक्षणाचे महत्त्व, व्यसनमुक्ती, किशोरवयीन मुलांची निर्णयक्षमता, सोशल मीडियाचा योग्य वापर आणि पालकांची मुलांप्रती असलेली जबाबदारी यावर प्रभावी मार्गदर्शन केले.
याशिवाय महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे म्हणून रांगोळी स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठी चित्रकला स्पर्धा आणि नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व स्वराज्याची प्रेरणा मिळावी या उद्देशाने स्वराज्य गड-किल्ले बांधणी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या सर्व स्पर्धांना गावातील महिला, विद्यार्थी व शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले असून सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे प्रतिष्ठानच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.
दीपावलीचा आनंद समाजातील गरजूंपर्यंत पोहोचावा या सामाजिक भावनेतून कोवाडे-दाभेवाडी परिसरातील निराधार महिला व पुरुषांना फराळाचे वाटप करण्यात आले. गरजू घटकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा प्रतिष्ठानचा हा छोटासा प्रयत्न ठरला.
या सर्व उपक्रमांच्या यशस्वितेसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश देसाई यांच्यासह ओंकार देसाई, संतोष चिमणे, अमर नार्वेकर, अक्षय साठे, विशाल साळी, युवराज गोंधळी, किशोर माणगावकर, प्रमोद साठे, प्रतीक साठे, शुभम देसाई, शिवराज देसाई, कार्तिक गोंधळी, सौरभ देसाई, सुहास देसाई, अनिकेत देसाई, सचिन बराटे, सतीश देवेकर, प्रशांत देसाई, अभी देवेकर यांच्यासह प्रतिष्ठानच्या सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.
केवळ उत्सव साजरा करणे हा उद्देश न ठेवता शिक्षण, संस्कार, जनजागृती, सामाजिक बांधिलकी आणि गरजूंना मदतीचा हात या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचा स्वामी प्रतिष्ठान, कोवाडेचा संकल्प असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
स्वामी प्रतिष्ठान कोवाडेतर्फे दीपावलीनिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम उत्साहात संपन्न
|