बातम्या
कोल्हापूर : दिवाळीत बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसेसवर कारवाई करा; शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचा इशारा
By nisha patil - 3/11/2026 3:33:29 PM
Share This News:
कोल्हापूर : दिवाळीत बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसेसवर कारवाई करा; शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचा इशारा
कोल्हापूर प्रतिनिधी - अजित बोडके कोल्हापूर, दि. ३ - दिवाळी सणानिमित्त मुंबई, पुणे येथून कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या आणि जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या खासगी बसेसकडून सर्रास बेकायदेशीर प्रवासी वाहतूक सुरू आहे. या बेकायदा वाहतुकीमुळे सर्वसामान्य प्रवाशांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असून यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्र वाहतूक सेना (महासंघ) च्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षल बाळासो पाटील यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी, ताराबाई पार्क, कोल्हापूर यांना निवेदन दिले. या निवेदनावर महाराष्ट्र राज्य सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी यांना हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात काय म्हटले आहे?
दिवाळी सणानिमित्त मुंबई, पुणे या ठिकाणांहून अनेक चाकरमानी आपापल्या गावी कोल्हापूर जिल्ह्यात येत-जात असतात. याच संधीचा फायदा घेऊन अनेक खासगी कंपनीच्या बसेस प्रवाशांकडून अन्यायी पद्धतीने अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारत आहेत. हा अतिरिक्त भुर्दंड सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत असल्याने RTO कार्यालयाने यावर विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
वाहतूक सेनेच्या प्रमुख मागण्या :
१. बेकायदा प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी विशेष मोहीम आखण्यात यावी.
२. प्रवाशांच्या तक्रारींसाठी RTO कार्यालयाकडून तात्काळ हेल्पलाईन सेवा सुरू करावी.
३. वायुवेग पथक २४ तास कार्यरत ठेवून त्या मार्फत तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
४. हेल्पलाईन क्रमांक सोशल मीडिया व वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रवाशांपर्यंत पोहोचवावा आणि तक्रारींची तात्काळ दखल घ्यावी.
दरम्यान, या मागण्यांची नोंद घेऊन तातडीने कारवाई झाली नाही, तर संघटनेच्या वतीने बेकायदा बसेस रोखून धरण्यात येतील आणि यातून निर्माण होणाऱ्या परिणामास RTO कार्यालय जबाबदार असेल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनामुळे आता RTO प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी विशाल देवकुळे, मंजीत माने, राजू यादव, दिनेश परमार, दत्ता फराकटे, संभाजी भोकरे, राहुल कांबळे, राजू सांगावकर, सुरज कांबळे, अभिजीत काटाळे, रियाज अत्तार, निलेश महेकर, किशोर तारळेकर, सुशांत चव्हाण यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूर : दिवाळीत बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसेसवर कारवाई करा; शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचा इशारा
|