बातम्या
कोल्हापुरी ब्रँड विश्वभर पोहोचवा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
By Administrator - 8/9/2025 4:47:28 PM
Share This News:
कोल्हापुरी ब्रँड विश्वभर पोहोचवा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर, दि. 8 : कोल्हापुरी चप्पलने देशभरात स्वतंत्र ओळख निर्माण केली असली तरी एवढ्यावर समाधान मानू नये. येथील कारागिरांनी हा ब्रँड जगभर पोहोचवावा, असे आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
गारगोटी रोड, कळंबा येथील ‘जय पॅलेस’मध्ये हॅण्डक्राफ्ट आर्टिस्ट डेव्हलपमेंट सोसायटी-कोल्हापूरतर्फे आयोजित ‘कोल्हापुरी चप्पल कारागीर’ कार्यशाळेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार अशोकराव माने अध्यक्षस्थानी होते.
आबिटकर म्हणाले, “कारागिरांनी सबसिडी-आधारित काम न करता बँकर्स व शासकीय यंत्रणांना सोबत घेऊन व्यवसाय वृद्धिंगत करावा. अशा कार्यशाळांची संख्या वाढवल्यास प्राडा सारख्या ब्रँडसमोर ‘कोल्हापूर’ नाव उभे राहील. शासन आवश्यक त्या सर्व बाबींसाठी कारागिरांना मदत करेल.”
आ. माने यांनीही कारागिरांना आवाहन करताना “सचोटी व प्रामाणिकपणे व्यवसाय करावा, गुणवत्तेत तडजोड करू नये” असे सांगितले.
या प्रसंगी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजयकुमार पाटील, संत रोहिदास चर्मोद्योग मंडळाचे अधिकारी अमोल शिंदे, नाबार्डचे अशुतोष जाधव, हस्तकला विकास आयुक्त पल्लवी जांबुळकर, सोसायटी अध्यक्ष दीपक यादव, सचिव जयवंत सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हमिदा देसाई यांनी केले.
कोल्हापुरी ब्रँड विश्वभर पोहोचवा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
|