राजकीय

ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि जनजागृती मोहिमांमध्ये पुढाकार घ्यावा- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

Take the lead in preventive healthcare and awareness campaigns in rural areas


By nisha patil - 7/5/2026 2:30:58 PM
Share This News:



ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि जनजागृती मोहिमांमध्ये पुढाकार घ्यावा- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

 

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत तोंडाच्या शस्त्रक्रियेशी संबंधित दंत उपचारांचा समावेश करण्यात आलेला आहे; सुलभ मौखिक आरोग्यसेवेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. तोंडाचा कर्करोग, दातांमध्ये कीड आणि हिरड्यांचे आजार यांसारखी आव्हाने उभी आहेत, वैद्यकीय संस्थानी विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा उपलब्ध करुन  देण्यासोबतच  जनजागृती मोहिमांमध्ये पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

 

एम. ए. रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरच्यावतीने आझम कॅम्पस येथे आयोजित २० व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. रमणदीप दुगल, उपप्राचार्य (प्रशासन) डॉ. सलीका शेख, उपप्राचार्य (शैक्षणिक) डॉ. विवेक हेगडे, सचिव प्रा. इरफान शेख तसेच प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

 

श्री. मुश्रीफ म्हणाले, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या  (एमयूएचएस) ‘सेंटर्स ऑफ एक्सलन्स’, आंतरवासिता कार्यक्रम आणि जागतिक सहकार्य उपक्रमांद्वारे आरोग्य शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी महाराष्ट्र शासन काम करीत आहे. डिजिटल साधने, कृत्रिम बुद्धिमत्ता  सिम्युलेशन-आधारित शिक्षण आणि कमीत कमी हस्तक्षेप करणाऱ्या उपचार पद्धतींमुळे दंतवैद्यक क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे. विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी नवकल्पना, संशोधन आणि स्वदेशी विकासावर लक्ष केंद्रित करावे, जेणेकरून आरोग्य शिक्षणाला सेवेमध्ये त्याचा खरा अर्थ प्राप्त होईल.  भारताकडे केवळ तंत्रज्ञान वापरण्याचीच नव्हे, तर ते निर्माण करण्याचीही क्षमता आहे. ही बाब विचारात घेता महाराष्ट्र शासन आरोग्य शिक्षण अधिक सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहे. 

 

ते पुढे म्हणाले, एम. ए. रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर या प्रतिष्ठित संस्थेचा २५ वर्षांचा प्रवास हा केवळ कालावधीचा टप्पा नसून, तो दूरदृष्टी, शिस्त आणि सातत्यपूर्ण उत्कृष्टतेचे प्रतीक आहे.


डॉ. पी. ए. इनामदार यांच्या दूरदृष्टी आणि समर्पणामुळे या संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू असून हजारो विद्यार्थी आणि कुटुंबांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडवला आहे. अशा संस्था केवळ पायाभूत सुविधांवर उभ्या राहत नाहीत, तर त्यामागे त्याग, मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी असते. शिक्षण आणि राष्ट्रनिर्मिती क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा समाजाला खरोखरच मोठा लाभ झाला आहे. 

 

या प्रतिष्ठित संस्थेने शैक्षणिक आणि वैद्यकीय उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून मोठी प्रगती साधली आहे.आजपर्यंत १ हजार ३८२ दंत पदवीधर आणि ५०५ पदव्युत्तर विद्यार्थी घडविले असून, जागतिक स्तरावर माजी विद्यार्थ्यांचे जाळे निर्माण केले आहे.

 

या संस्थेने व्हिएन्ना विद्यापीठ, किंग्स कॉलेज लंडन, जे. मोरिटा जपान, एंडोस्टार पोलंड आणि एमआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांसारख्या नामांकित संस्था आणि विद्यापीठांशी सामंजस्य करार केले आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ झ्युरिक, बर्ग, कझाकस्तान, मराठा मंडळ नाथाजीराव जी. हळगेकर इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्स अँड रिसर्च सेंटर, बेळगावी, डॉ. डी. वाय. पाटील डेंटल कॉलेज, पुणे, येनेपोया विद्यापीठ, मंगळुरू, ईसीओ अकॅडमी, कोलकाता अशा संस्थांसोबतच्या सहकार्यामुळे या संस्थेचे शैक्षणिक जाळे अधिक बळकट झाले आहे. ही संस्था सेवा, शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी या मूल्यांवर उभी आहे. आजच्या जगात अशा भागीदाऱ्या सुसंगत आणि स्पर्धात्मक राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत.

 

यापुढे पदवीसोबत तुमच्यावर एक मोठी जबाबदारीही आली आहे. कौशल्य तुम्हाला यशस्वी बनवेल, नैतिकता तुम्हाला आदर मिळवून देईल आणि करुणा तुम्हाला कायम स्मरणात ठेवेल, नवकल्पना, सहकार्य आणि मानवतेच्या सेवेमुळे आपले भवितव्य आणखी प्रभावी आणि प्रेरणादायी ठरेल. ही बाब विचारात घेऊन काम करावे. संस्थेनेही कुशल दंतवैद्यच नव्हे, तर समाजासाठी संवेदनशील आणि सेवाभावी आरोग्यसेवक घडवावे, अशा शुभेच्छा मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिल्या.

 

श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रतिनिधित्व स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले.


ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि जनजागृती मोहिमांमध्ये पुढाकार घ्यावा- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
Total Views: 6