मनोरंजन
कॉन्सर्ट व्हिडीओ वादावर तारा सुतारियाची प्रतिक्रिया; ‘व्हायरल क्लिप फेक आणि एडिटेड’ असल्याचा दावा
By nisha patil - 12/31/2025 12:22:15 PM
Share This News:
अभिनेत्री तारा सुतारियाचा मुंबईतील एका म्युझिक कॉन्सर्टमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. तारा तिचा कथित बॉयफ्रेंड वीर पहारियासोबत मुंबईत एपी ढिल्लोच्या कॉन्सर्टला उपस्थित होती. एपी ढिल्लोच्या एका म्युझिक व्हिडीओमध्ये झळकल्यामुळे तिने कॉन्सर्टदरम्यान त्याच्यासोबत स्टेज शेअर केले होते.
कॉन्सर्टदरम्यान तारा आणि एपी ढिल्लो यांच्यात झालेल्या संवादाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या क्लिपमध्ये ताराने एपीला मिठी मारून त्याच्या गालावर किस केल्याचे, तसेच त्यानंतर एपीनेही तिला मिठी मारत किस करण्याचा प्रयत्न केल्याचे दाखवण्यात आले आहे. या सगळ्या प्रकारावर वीर पहारियाच्या चेहऱ्यावरील प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली होती. या व्हिडीओवरून अनेक मीम्सही सोशल मीडियावर व्हायरल झाले.
या प्रकरणावर आता तारा सुतारियाने अखेर मौन सोडले आहे. तिने सोशल मीडियावर कॉन्सर्टमधील मूळ आणि संपूर्ण व्हिडीओ शेअर करत व्हायरल होत असलेली क्लिप बनावट आणि एडिट केलेली असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘सोशल मीडियावर फिरणारा व्हिडीओ खरा नाही,’ असे तिने ठामपणे सांगितले.
इतकेच नव्हे तर आपल्या विरोधात जाणूनबुजून नकारात्मक पीआर मोहीम राबवली जात असल्याचा गंभीर आरोपही ताराने केला आहे. आपली बदनामी करण्याच्या उद्देशाने अपमानास्पद कॅप्शन आणि चुकीच्या क्लिप्स पसरवल्या जात असल्याचा दावा तिने केला असून, चाहत्यांनी सत्य ओळखावे, असे आवाहन तिने केले आहे.
कॉन्सर्ट व्हिडीओ वादावर तारा सुतारियाची प्रतिक्रिया; ‘व्हायरल क्लिप फेक आणि एडिटेड’ असल्याचा दावा
|