बातम्या

*शाळा वाचवा, शिक्षण वाचवा "या व्यापक आंदोलनाला पाठिंब्यासाठी शिक्षक समितीचे तालुकास्तरीय धरणे आंदोलन*

Teachers Committee holds taluka


By nisha patil - 10/13/2026 3:03:22 PM
Share This News:



*शाळा वाचवा, शिक्षण वाचवा "या व्यापक आंदोलनाला पाठिंब्यासाठी शिक्षक समितीचे तालुकास्तरीय धरणे आंदोलन*
 

*आजरा(हसन तकीलदार):-शाळा वाचवा, शिक्षण वाचवा अभियानांतर्गत शाळा बंद पाडण्याच्या सरकारच्या धोरणास विरोध, शिक्षकावरील अतिरिक्त ऑनलाईन कामाचा ताण कमी करणे तसेच इतर प्रलंबित शैक्षणिक प्रश्नाबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा आजरा यांच्या वतीने पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून आपल्या समस्यांचे व मागणीचे निवेदन गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले.
   

या निवेदनात म्हटले आहे की, बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची जबाबदारी शासनावर सोपवण्यात आली आहे. मात्र विद्यार्थी संख्येच्या निकषावर शाळा बंद होण्याची किंवा एकत्रिकरणाच्या प्रक्रियेत जाण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यामुळे ग्रामीण व वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्कावर प्रतिकूल परिणाम होऊन गदा येण्याची भीती आहे. त्यामुळे विद्यार्थी संख्या कमी असल्याच्या कारणांवरून शाळा बंद करण्याऐवजी त्या शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या वाढवण्यासाठी, शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि आवश्यक शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सकारात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. याशिवाय शिक्षकांचा बहुतांश वेळ प्रशासकीय कामकाजात खर्च होत असल्यामुळे शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळणे, प्रशासकीय कामकाज सुलभ होणे आणि अनावश्यक माहिती मागणीला आळा बसणे आवश्यक आहे. 
   

  याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा आजराच्या वतीने शाळा वाचवा,शिक्षण वाचवा या व्यापक अभियानाला पाठिंबा देण्यासाठी तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांच्या संरक्षणासाठी तालुका स्तरीय एक दिवशीय धरणे आंदोलन करून आपल्या मागण्यांचे निवेदन गटशिक्षण अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी कॉ. संपत देसाई, सुनील शिंदे (पुणे विभाग संपर्क प्रमुख ), सामाजिक कार्यकर्ते सुधीर सुपल, बळवंत शिंत्रे(शिक्षक नेते),सौ. सारिका पाटील, सौ. अनुष्का गोवेकर यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी आपल्या मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांचे संरक्षण करण्यात यावे. शासन निर्णयाचा पुनर्वीचार करून शाळा बंद होण्यास किंवा विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित करणाऱ्या तरतुदी रद्द करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा, गाव तेथे शाळा आणि शाळा तेथे शिक्षक हे तत्व प्रभाविपणे अंमलात आणावे.शिक्षकांवर लादण्यात येणाऱ्या अनावश्यक ऑनलाईन माहिती संकलनाच्या कामांना आळा घालावा. नियमित अध्यापनात व्यत्यय येणाऱ्या अनावश्यक दैनंदिन लिंक व माहिती मागणीबाबत योग्य निर्देश व्हावेत. शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधीशी चर्चा करून शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्याशी संबंधित प्रलंबित प्रश्नावर सकारात्मक व कालबद्ध निर्णय घेण्यात यावेत अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या आहेत.
   

निवेदन स्वीकारताना  पंचायत समितीच्या प्र.अध्यक्षा यशोदा पोवार यांनी याबाबत सकारात्मक विचार करण्यासाठी शासन दरबारी निवेदन पोहचवण्याचे काम केले जाईल अशी ग्वाही दिली.
यावेळी एकनाथ गिलबिले (अध्यक्ष शिक्षक समिती आजरा), बळीराम तानवडे, सुभाष विभुते, सौ. सुरेखा नाईक तसेच येरंडोळ, इटे, लाटगाव, साळगाव, पेरणोली, गणेशवाडी, उत्तूर, मेढेवाडी इ. गावांच्या शाळा व्यावस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. आभार शिवाजी बोलके यांनी मानले.


*शाळा वाचवा, शिक्षण वाचवा "या व्यापक आंदोलनाला पाठिंब्यासाठी शिक्षक समितीचे तालुकास्तरीय धरणे आंदोलन*
Total Views: 324