शैक्षणिक
टीईटी बंधनकारक निर्णयामुळे शिक्षकांमध्ये संताप; दादा भुसे यांना निवेदन
By nisha patil - 9/16/2025 1:09:25 PM
Share This News:
सुप्रीम कोर्टाने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकवणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी आणि अनुदानित शाळांतील सर्व शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य केली आहे. तसेच सेवेतील शिक्षकांनी पुढील दोन वर्षांत टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे.
जे शिक्षक परीक्षेत अपयशी ठरतील त्यांना सेवानिवृत्ती घ्यावी लागणार असून, सेवेत शेवटची पाच वर्षे शिल्लक असलेल्या शिक्षकांना पदोन्नती व वेतनवाढ रोखली जाणार आहे.
या निर्णयामुळे २५ ते ३० वर्षे सेवा केलेल्या हजारो शिक्षकांच्या नोकरीवर गंडांतर येऊ शकते. शिक्षकी पेशासाठी आवश्यक सर्व पदव्या व प्रशिक्षण पूर्ण करून अनेक वर्षे कार्यरत असलेल्या शिक्षकांवर हा अन्याय असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांना या निर्णयातून वगळावे आणि टीईटीसंदर्भात पुनर्विचार करावा अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. दोन दिवसांत उच्चस्तरीय समितीची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
टीईटी बंधनकारक निर्णयामुळे शिक्षकांमध्ये संताप; दादा भुसे यांना निवेदन
|