शैक्षणिक
गणेश विसर्जनाची जबाबदारी शिक्षकांवर
By nisha patil - 3/9/2025 11:16:46 AM
Share This News:
“गणेश विसर्जनाची जबाबदारी शिक्षकांवर... शिक्षकांचा विरोध... खंडपीठात दाखल याचिका... आज होणार महत्त्वाची सुनावणी...”
कोल्हापूर महानगरपालिकेने गणेश विसर्जनाची जबाबदारी शिक्षकांवर टाकली आहे. या निर्णयाविरोधात शिक्षकांनी नाराजी व्यक्त करत थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे की —
“शैक्षणिक कामांबरोबरच निवडणुका, जनगणना यांसारख्या अनेक अतिरिक्त जबाबदाऱ्या आधीच आमच्यावर येतात. आता गणेश विसर्जनाची जबाबदारी सोपवणे हे शिक्षण क्षेत्राशी कोणत्याही प्रकारे संबंधित नाही. त्यामुळे आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.”
या याचिकेवर आज, म्हणजेच बुधवारी, खंडपीठात सुनावणी होणार आहे. महापालिका प्रशासन आणि शिक्षण विभागाला याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.
यापूर्वीही शिक्षक संघटनांनी निवेदनाद्वारे महापालिकेला गणेश विसर्जनाची जबाबदारी देऊ नये, अशी मागणी केली होती. शासनाच्या २०२४ च्या निर्णयानुसारही शिक्षकांना फक्त शैक्षणिक, तसेच निवडणूक आणि जनगणना यासारखी काही विशिष्ट कामेच बंधनकारक आहेत. यापलीकडील कामे देणे योग्य नाही, असा मुद्दा याचिकेत मांडला आहे.
म्हणूनच ही सुनावणी केवळ कोल्हापूरपुरती मर्यादित नसून, राज्यभरातील शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त जबाबदाऱ्यांबाबतही महत्त्वाची ठरणार आहे. न्यायालयाने कोणता निर्णय दिला, यावर पुढे शिक्षकांच्या कामकाजाची दिशा ठरणार आहे.
तर आजची ही सुनावणी शिक्षकांसाठी आणि शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पुढील घडामोडींवर सर्वांचे ल लक्ष लागलेले आहे
गणेश विसर्जनाची जबाबदारी शिक्षकांवर
|