विशेष बातम्या
विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदार नोंदणी सहविचार सभेत शिक्षकांचा निर्धार
By nisha patil - 3/11/2025 3:42:00 PM
Share This News:
विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदार नोंदणी सहविचार सभेत शिक्षकांचा निर्धार — “कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेत पाठविण्यासाठी जीवाचे रान करू”
कोल्हापूर | 3 नोव्हेंबर 2025 महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणारे, द्रष्टे समाजचिंतक आणि शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेत शिक्षक आमदार म्हणून विजयी करण्याचा निर्धार शिक्षकांनी व्यक्त केला.
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे पुणे विभाग शिक्षक मतदार नोंदणीसाठी आयोजित सहविचार सभेत कोल्हापूर विभागप्रमुख श्रीराम साळुंखे यांनी म्हटले की, “शिक्षक समाजाच्या विकासाचा मुख्य घटक आहे. शिक्षकांच्या सर्वांगीण प्रश्नांची जाण असणारा आणि त्यासाठी लढा देणारा आपला प्रतिनिधी विधान परिषदेवर पोहोचला पाहिजे. हीच योग्य वेळ आहे.”
या सभेच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, “संस्थेने आतापर्यंत तीनवेळा शिक्षक आमदार निवडून दिले आहेत. बदलत्या शिक्षणप्रवाहात शिक्षकांच्या अडचणी समजून घेणारा प्रतिनिधी आवश्यक आहे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कौस्तुभ गावडे हे सक्षम नेतृत्व देऊ शकतात. शिक्षक मतदार नोंदणी ६ नोव्हेंबरपर्यंत सुरू असून सर्वांनी यात सहभाग घ्यावा.”
या प्रसंगी कोल्हापूर जिल्हा प्रमुख श्री भूपाल कुंभार यांनी जिल्ह्यातील मतदार नोंदणीचा आढावा सादर करून शिक्षकांना मार्गदर्शन केले.
अधिकृत उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, “जुनी पेन्शन योजना, संचमान्यता, टप्पा अनुदान, पवित्र प्रणाली, शिक्षक पात्रता परीक्षा (TET) सक्ती, वेतनेत्तर अनुदान यांसारख्या विषयांवर न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”
या सहविचार सभेला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक मतदार नोंदणी जिल्हा व तालुकाप्रमुख, बुथप्रमुख तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदार नोंदणी सहविचार सभेत शिक्षकांचा निर्धार
|