बातम्या

आंबोली घाटात भीषण अपघात – कोल्हापूरच्या 23 वर्षीय युवकाचा मृत्यू,

Terrible accident at Amboli Ghat


By nisha patil - 4/21/2025 3:37:31 PM
Share This News:



आंबोली घाटात भीषण अपघात – कोल्हापूरच्या 23 वर्षीय युवकाचा मृत्यू,

बाईक रायडिंगच्या आनंदात काळानं घेतला घाला

आजरा-आंबोली राष्ट्रीय महामार्गावर देवर्डे ते माझ्या दरम्यान एका धोकादायक वळणावर रविवारी सकाळी मोटरसायकल व चारचाकी (तवेरा) यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कोल्हापूर येथील सिद्धेश विलास रेडेकर (वय 23, रा. माळी कॉलनी, टाकळा, कोल्हापूर) या युवकाचा मृत्यू झाला आहे. सिद्धेश हा कोल्हापूरमध्ये आर्किटेक्चरचे सहशिक्षण घेत होता.

सिद्धेश रेडेकर याला मोटरसायकल राइडिंग आणि फोटोग्राफीची विशेष आवड होती. रविवारी सकाळी सहा वाजता तो आणि त्याचे चार मित्र कोल्हापुरातून आंबोली घाटातील राइडिंगसाठी निघाले होते. घाटात विविध ठिकाणी त्यांनी फोटो सेशन्स केले आणि नंतर परतीच्या मार्गावर होते. सिद्धेश आपल्या रायडर गाडीवर पुढे होता, त्याच्यासमोर एक मित्र, आणि मागे दोन मित्र होते.

दरम्यान, देवर्डे-माझ्या दरम्यान असलेल्या एका धोकादायक वळणावर कोल्हापुराहून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या तवेरा गाडीची सिद्धेशच्या बाईकला समोरासमोर जोरदार धडक बसली. या अपघातात त्याच्या डोक्यावरील हेल्मेट तुटून रस्त्याच्या कडेला पडले. त्याच्या डोक्याला, छातीत व हाताला गंभीर दुखापत झाली.

त्याला तातडीने आजरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याला गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या घटनेबाबत सिद्धेशचा मित्र नितांत पोराने यांनी आजरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, तवेरा गाडीचा चालक विजय अरविंद पाटील (रा. यादव नगर, कोल्हापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघातामुळे मित्र परिवारात व कोल्हापूर परिसरात शोककळा पसरली आहे.


आंबोली घाटात भीषण अपघात – कोल्हापूरच्या 23 वर्षीय युवकाचा मृत्यू,
Total Views: 279