विशेष बातम्या

नवले ब्रीजवर भीषण अपघात : ब्रेक फेल ट्रकने वाहनांचा चेंगराचेंगरीत चुराडा

Terrible accident on Navale Bridge


By nisha patil - 11/14/2025 11:07:16 AM
Share This News:



पुणे:-  पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नवले ब्रीजवरील सेल्फी पॉईंटजवळ आज दुपारी अत्यंत भीषण अपघात घडला. राजस्थान पासिंगचा लोडेड ट्रक साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जात असताना अचानक त्याचे ब्रेक फेल झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे. घटनास्थळी रस्त्यावर ट्रकचे लांबवर दिसणारे ब्रेकचे निशाण याची पुष्टी करतात.

ब्रेक निकामी झाल्यानंतर वेग नियंत्रणाबाहेर गेलेल्या या ट्रकने पुढे असणाऱ्या अनेक वाहनांना एकामागून एक धडक दिली. धडक शक्तीशाली असल्यामुळे काही वाहने रस्त्यावर फेकली गेली, तर काही गंभीरपणे क्षतिग्रस्त झाली.

या धडकेनंतर ट्रक पुढे जाऊन एका मोठ्या कंटेनरलाही जोरदार धडकला. कंटेनरच्या अगोदर असलेली एक कार थेट ट्रक आणि कंटेनरच्या मध्ये अडकून चक्काचूर झाली. ही कार प्रचंड दाबली गेल्यामुळे चालकाला बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. धडकेनंतर काही क्षणातच कारने पेट घेतला आणि काही वेळाने ट्रकनेही भीषण ज्वाळा धारण केल्या. घटनास्थळी प्रचंड धूर आणि आगीचे लोट उठत असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी बचावासाठी धाव घेतली तरी आगीमुळे जवळ जाणे कठीण झाले. पोलिसांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले असून, आग विझवण्याचे आणि अडकलेल्या नागरिकांचे प्राण वाचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रेक फेल झालेल्या ट्रकच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. धडकेत अडकलेल्या इतर प्रवाशांच्या संदर्भात तपशील मिळत नसून, अडकलेल्या कारमध्ये किती लोक आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, महामार्गावर दोन्ही बाजूंनी मोठी वाहनरांग लागली आहे. पोलिसांचे प्राथमिक उद्दिष्ट सध्या अडकलेले लोक बाहेर काढणे आणि आग आटोक्यात आणणे हे आहे.


वसंत मोरेंचा प्रशासनावर संताप : “कॅमेरे बसवून काही साध्य होत नाही”

या भीषण अपघातानंतर माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, नवले ब्रीज हा पुणे शहरातील एक अत्यंत संवेदनशील व धोकादायक उताराचा भाग आहे. येथे फक्त रमलर, कॅमेरे बसवणे किंवा वेगमर्यादेची फलक लावणे हे कितीही केलं तरी अपघात कमी होणार नाहीत. या रस्त्याची उंच-सखल रचना, सततचा उतार, वाढती वाहतूक आणि वेगातील अनियंत्रितपणा याचा सर्वंकष अभ्यास करूनच उपाययोजना करणं अत्यावश्यक आहे.

मोरेंनी असा सवाल उपस्थित केला की, नवले ब्रीजच्या अलिकडे कोणतीही वाहतूक कोंडी नव्हती, मग अचानक ब्रेक फेल होणाऱ्या वाहनांविरुद्ध कॅमेऱ्यामध्ये नोंद झाल्यानंतर काही प्रतिबंधात्मक कारवाई का होत नाही? त्यांनी NHUI चा कारभार पूर्णतः भोंगळ असल्याचे म्हणत, केवळ अपघात झाल्यानंतर नेते, आमदार आणि मंत्र्यांचे पाहणी दौरे होतात; परंतु तज्ज्ञांचा सखोल अभ्यास, उपाययोजना किंवा कायमस्वरूपी निराकरण या बाबत कोणीही पुढाकार घेत नाही, अशी टीका केली.


उच्चस्तरीय चौकशीची मागणी

या दुर्घटनेनंतर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनीही गंभीर चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारचे अपघात सतत होत असून नागरिकांचे जीव धोक्यात आहेत, त्यामुळे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून मूळ समस्यांचा शोध घेऊन तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली.


नवले ब्रीजवर भीषण अपघात : ब्रेक फेल ट्रकने वाहनांचा चेंगराचेंगरीत चुराडा
Total Views: 48