राजकीय

प्रचाराच्या दारातच कसोटी; महापालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची थेट चौकशी

Test at the doorstep of the campaign Direct interrogation of candidates interested in municipal elections


By nisha patil - 12/26/2025 2:52:12 PM
Share This News:



कोल्हापूर :- आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रभागात इच्छुक उमेदवारांनी प्रचारयंत्रणा कार्यान्वित केली आहे. पत्रके वाटप, घरोघरी भेटी आणि समर्थकांच्या माध्यमातून संवाद सुरू असतानाच, प्रचारासाठी गेलेल्या उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना मतदारांच्या थेट प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नांमधून उमेदवारांची तयारी, भूमिका आणि स्थानिक प्रश्नांवरील जाण किती आहे, याची चाचपणी मतदारांकडून केली जात आहे.

मतदारांकडून विचारले जाणारे मुद्देसूद आणि कधी खोचक प्रश्न पाहता उमेदवार किती अभ्यासपूर्वक मैदानात उतरले आहेत, हे स्पष्ट होत आहे. त्याचवेळी उमेदवारांनाही प्रचारादरम्यान आपल्या उणिवा लक्षात येत असून, कोणत्या विषयांवर अधिक तयारी करणे गरजेचे आहे, याची जाणीव होत आहे. उमेदवारी अर्ज, छाननी आणि अधिकृत यादी जाहीर झाल्यानंतर प्रचार आणखी गती घेण्याची शक्यता आहे.

काही इच्छुकांनी आधीच परिसरातील विकासकामे, प्रलंबित प्रश्न आणि भविष्यातील नियोजन यांचा समावेश असलेली माहितीपत्रके तयार केली आहेत. काही प्रभागांत उमेदवार स्वतः मतदारांच्या घरी भेट देत आहेत, तर काही ठिकाणी महिला कार्यकर्ते आणि समर्थक प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.

सजग मतदार, सावध उमेदवार

मत मागण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांकडून प्रश्न विचारणे आणि अपेक्षा मांडणे, हे लोकशाही प्रक्रियेचे लक्षण असल्याचे मतदार सांगत आहेत. तयारी असलेले उमेदवार समाधानकारक उत्तरे देत असले तरी चुकीच्या उत्तरामुळे परिसरात चर्चा होण्याची शक्यता असल्याने अनेकजण सावध भूमिका घेत आहेत. मात्र पुरेशी तयारी न करता प्रचारात उतरलेल्या उमेदवारांची काही घरांमध्ये प्रश्नोत्तरांच्या फेरीत अडचण होत असल्याचे दिसून येत आहे.

स्थानिक प्रश्नांपासून राजकीय भूमिकेपर्यंत चौकशी

प्रचारादरम्यान मतदारांकडून नियमित पाणीपुरवठा, कचरा संकलनाची वेळ, भटकी कुत्री व जनावरांचा बंदोबस्त, भाजी मंडईची व्यवस्था, उद्यानांतील गैरप्रकारांवर नियंत्रण यासारख्या रोजच्या प्रश्नांवर थेट चर्चा होत आहे. यासोबतच थेट पाईपलाईनची रखडलेली कामे, बंद असलेले पूल, पर्यायी सुविधांचा अभाव, उमेदवाराची राजकीय निष्ठा, गटबाजी आणि पक्षबदलाबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

एकंदर चित्र पाहता, महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मतदार अधिक जागरूक झाल्याचे दिसून येत असून, आश्वासनांपेक्षा ठोस भूमिका आणि स्पष्ट उत्तरे देणाऱ्या उमेदवारांनाच मतदार पसंती देतील, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे.


प्रचाराच्या दारातच कसोटी; महापालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची थेट चौकशी
Total Views: 24