राजकीय
ठाकरे बंधूंच्या युतीवर अखेर शिक्कामोर्तब
By nisha patil - 12/25/2025 1:31:50 PM
Share This News:
मुंबई : गेली दोन दशके वेगवेगळ्या राजकीय वाटांवर असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे अखेर एकत्र आले असून, मुंबई महापालिका निवडणूक युतीत लढण्याची अधिकृत घोषणा बुधवारी करण्यात आली. वरळी येथील हॉटेल ब्ल्यू सी येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंनी ही घोषणा करत महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
या घोषणेनंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. युतीतील जागावाटपाचा फॉर्म्युला आणि उमेदवारांची संख्या जाहीर करण्यात आली नसली, तरी मुंबईचा महापौर हा मराठी माणूसच होईल आणि तो आमचाच असेल, असा ठाम निर्धार राज ठाकरे यांनी व्यक्त केला.
युतीच्या घोषणेपूर्वी उद्धव ठाकरे यांनी दादर येथील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी कुंदा ठाकरे यांनी दोन्ही बंधूंना औक्षण करून आशीर्वाद दिला. त्यानंतर दोघांनी एकत्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले.
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुंबई व नाशिक महापालिकेसाठी युती निश्चित झाल्याचे स्पष्ट केले, तर अन्य महापालिकांबाबत योग्य वेळी निर्णय जाहीर केला जाईल, असे सांगितले. मराठी माणसाच्या हक्कांसाठी आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या कोणत्याही प्रयत्नांविरोधात लढण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी या युतीला “मराठी ऐक्याचा मंगल कलश” असे संबोधले असून, या युतीच्या माध्यमातून मुंबईसह अनेक महापालिकांमध्ये भगवा फडकवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढण्याची राज-उद्धव यांची घोषणा
|