बातम्या
जिल्ह्यातील 320 मेगावॅटच्या मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेला गती द्यावी
By Administrator - 7/8/2025 4:26:20 PM
Share This News:
जिल्ह्यातील 320 मेगावॅटच्या मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेला गती द्यावी
टास्क फोर्सच्या बैठकीत महावितरणचे सीएमडी लोकेश चंद्र यांचे निर्देश
कोल्हापूर, दि. ०७ ऑगस्ट २०२५: शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० मधून शेतकऱ्यांचे दिवसा वीजपुरवठा करण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 77 ठिकाणी एकूण 320 मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून याद्वारे शेतीला दिवसा वीजपुरवठा होणार आहे. सध्या ११ ठिकाणांवरील एकूण ३९ मेगावॅट क्षमतेचे ऊर्जा प्रकल्पांचे काम पूर्ण झाले असून यातून १४,९४२ शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होत आहे. या योजनेच्या कामांना आणखी गती द्यावी असे आदेश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी गुरुवारी (दि. ०७) दिले.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनीच्या जिल्हास्तरीय टास्क फोर्सची आढावा बैठक झाली. यावेळी लोकेश चंद्र बोलत होते. कार्यकारी संचालक परेश भागवत( देयक व महसूल), सल्लागार श्रीकांत जलतारे, प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, विशेष कार्य अधिकारी मंगेश कोहाट, महापारेषणचे शिदाप्पा कोळी, विद्युत निरीक्षक शकील सुतार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र म्हणाले की, मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरू झालेली मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० अन्य राज्यांसाठी मार्गदर्शक ठरली आहे. जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्पांद्वारे पुढील एक वर्षात १६ हजार मेगावॅट विजेचा शेतीला दिवसा पुरवठा करण्यात येणार आहे. एजन्सीने सर्व कामाचे अपडेट पोर्टलवर करणे बंधनकारक असून या कामाची पडताळणी नोडल अधिकारी म्हणून उप विभागीय अधिकारी यांनी करावी.
या योजनेचे शेतकऱ्यांना महत्त्व पटवून द्यावे. गैरसमजातून होणारे विरोध प्रबोधनाद्वारे दूर करावे. लोकसंवाद व सहकार्यातून या योजनेला गती देण्यासाठी टास्क फोर्सने पुढाकार घ्यावा. तसेच सौर प्रकल्पांसाठी आवश्यक शासकीय व खाजगी जमीन उपलब्ध करून घेणे, भूसंपादन करणे व सौर प्रकल्पांसाठी आवश्यक पायाभूत सेवेत सुधारणा करण्याचे कामांना गती देण्यात यावी असे निर्देश श्री. लोकेश चंद्र यांनी दिले.
महावितरणचे प्रत्येक कार्यालयात रूप टॉप सोलर सोलर बसवण्याचे काम लवकर पूर्ण होणार आहे. येत्या 15 ऑगस्टच्या ग्रामसभांत महावितरणच्या विविध योजनांची माहिती द्यावी, लोकप्रतिनिधी व स्थायिक स्वराज्य संस्था यांनाही या योजनांत सामील करून घ्यावे, कोल्हापूर व इचलकरंजी येथे होणाऱ्या ई बसच्या अनुषन्गाने महावितरणची कामे तात्काळ पूर्ण करून द्यावीत असे आदेश लोकेश चंद्र यांनी यावेळी दिले.
औद्योगिक संघटनांशी साधला संवाद
यावेळी लोकेश चंद्र यांनी जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटना सोबत संवाद साधला. औद्योगिक ग्राहकांसाठी स्वतंत्र स्वागत सेल पोर्टल करण्यात येत असून सर्व उद्योग संघटनांना त्यांचे स्वतंत्र आयडी पासवर्ड देण्यात येणार आहे. यामध्ये उद्योजक त्यांच्या समस्या व अपेक्षा मांडू शकतात . याचा आढावा मुख्यालय स्तरावरून नियमित घेतला जाणार आहे. उदयॊग व महावितरण एकत्र येऊन काम केले तर त्यांच्या समस्या लवकर सुटतील , याकरताच स्वागत सेल व पोर्टल केले आहे. राज्याचा उद्योग लोड दरवर्षी 6 टक्के वाढतो हे गृहीत धरून महावितरणने नियोजन केले आहे तसेच नवीकरणीय ऊर्जेचा राज्यातील सर्व ग्राहकांना फायदा मिळणार असे लोकेश चंद्र यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील 320 मेगावॅटच्या मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेला गती द्यावी
|