शैक्षणिक
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा 38 वा स्मृतिदिन उत्साहात साजरा
By Administrator - 8/8/2025 4:40:25 PM
Share This News:
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा 38 वा स्मृतिदिन उत्साहात साजरा
कोल्हापूर, दि. 8 ऑगस्ट: श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या 38 व्या स्मृतिदिनानिमित्त संस्थेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या मा.ना. पंकज भोयर (राज्यमंत्री) यांनी बापूजींच्या कार्याचा आदर्श घेऊन शिक्षकांनी समाज परिवर्तनात योगदान द्यावे, असे प्रतिपादन केले.
प्रमुख वक्ते कवी अविनाश भारती यांनी बापूजींच्या विचारधारेवर भाष्य करत, “ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कारासाठी शिक्षण” या तत्त्वाचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे होते. त्यांनी बापूजींच्या संघर्षमय कार्यावर प्रकाश टाकत, शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांना घडवावे, असे सांगितले.
कार्यक्रमात गुणवंत शाळा आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, कलाशिक्षक विजयकुमार शिंगण यांचा त्यांच्या रांगोळी विक्रमाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी ‘शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे विचारधन’ या पुस्तकाचे प्रकाशनही झाले.
कार्यक्रमात कला प्रदर्शन, परिसंवाद, प्रार्थना गीत, आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी स्वागतप्रास्ताविक केले. डॉ. कविता तिवडे व प्रा. सुप्रिया पाटील यांनी सूत्रसंचालन तर सिताराम गवळी यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि आजी-माजी सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा 38 वा स्मृतिदिन उत्साहात साजरा
|