विशेष बातम्या
मुख्याध्यापक महामंडळाच्या ६४ व्या राज्य अधिवेशनास कराड येथे प्रारंभ
By nisha patil - 10/25/2025 6:13:40 PM
Share This News:
मुख्याध्यापक महामंडळाच्या ६४ व्या राज्य अधिवेशनास कराड येथे प्रारंभ
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ मुंबईच्यावतीने ६४ व्या राज्यस्तरीय मुख्याध्यापकांच्या वार्षिक अधिवेशनास कराड येथील यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स येथे मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली . दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनास महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातून जवळपास दिडहजाराहून अधिक मुख्याध्यापकांची उपस्थिती होती . सातारा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने याचे नेटके नियोजन केले होते .
दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात शैक्षणिक आणि शिक्षकांवर लादलेल्या अशैक्षणिक बाबींवर सविस्तर चर्चा झाली . अधिवेशनाचे अध्यक्ष मुकेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले . माझी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील स्वागताध्यक्ष होते . सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पर्यटन मंत्री नामदार शंभूराजे देसाई यांनी अधिवेशनाचे औपचारिक उद्घाटन केले . आपल्या मनोगत त्यांनी वेळप्रसंगी वित्तीय बोजा सहन करू मात्र शाळांचे आणि शिक्षणाचे प्रश्न प्राधान्याने सोडवू असे आश्वासन दिले .
पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी प्रथम सत्रात गोरगरिबांच्या शाळा वाचल्या पाहिजेत यासाठी सरकारने ठोस भूमिका घेऊन आग्रही राहावे असे आवाहन केले . अधिवेशनाचे माजी अध्यक्ष सुभाष माने यांनी संघटनेच्या माध्यमातून वज्रमूठ दाखवून अधिकाऱ्यांना वठणीवर आणले पाहिजे तसेच अवैध मटका, दारू या उत्पादकांना एसआयटी नाही मात्र शिक्षण क्षेत्रात एसआयटी आणि टीईटी आणल्या गेलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले .
दुपारच्या सत्रात वाढत्या व शैक्षणिक कामाचा शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम या शोधनिबंधाचे सादरीकरण संतोष रावते यांनी केले यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष कौस्तुभ गावडे होते . माजी सहाय्यक आयुक्त यशवंत निकम यांनी राज्य अभ्यासक्रम आराखडा आणि मुख्याध्यापकांची भूमिका यावर मत व्यक्त करताना कर्तव्य बजावताना मुख्याध्यापक हक्कापासून वंचित राहिला आहे हे संदर्भासह सांगितले .
सायंकाळच्या सत्रात शिक्षणात एआय तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर यावरती शमशुद्दीन अत्तार आणि बी .बी . पाटील यांनी प्रात्यक्षिक सादरीकरण करून मुख्याध्यापकांचे उद्बोधन केले . शेवटच्या सत्रात कोरी पाटी या नाटीकेचे तसेच दीपक तडाखे यांच्या स्वरांगण ग्रुपने मराठमोळ्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले होते .
प्रारंभी महाराष्ट्र एज्युकेशनल जर्नल, प्रितीसंगम स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, महेश शिंदे, ज्ञानेश्वर म्हात्रे, अरुण थोरात, जयश्री पाटील, चंद्रकांत पाटील, तानाजी माने, आर.वाय. पाटील., रविंद्र मोरे, संजय सौंदलगे आदी मान्यवर उपस्थित होते .
मुख्याध्यापक महामंडळाच्या ६४ व्या राज्य अधिवेशनास कराड येथे प्रारंभ
|