बातम्या

कागल तालुक्याचाही दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करावा पंचायत समिती कागलच्या सभापती, उपसभापती व सदस्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व तहसीलदार कागल यांच्याकडे निवेदन

The Chairperson Deputy Chairperson and members


By nisha patil - 1/10/2026 2:57:17 PM
Share This News:



कागल तालुक्याचाही दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करावा पंचायत समिती कागलच्या सभापती, उपसभापती व सदस्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व तहसीलदार कागल यांच्याकडे निवेदन

कागल, दि. 30 सप्टेंबर 2026 : महाराष्ट्र शासनाने दि. 25 सप्टेंबर 2026 रोजी राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करून ‘ट्रिगर-1’ अंतर्गत दुष्काळग्रस्त म्हणून समाविष्ट करण्यात आलेल्या तालुक्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, कागल तालुक्यातील सध्याची पर्जन्यमान, पीक परिस्थिती व संभाव्य पिकांचे नुकसान लक्षात घेता कागल तालुक्याचाही दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करावा, अशी आग्रही मागणी पंचायत समिती कागलच्या मा.सभापती, मा. उपसभापती व सर्व सन्माननीय सदस्यांनी केली आहे.
    

कागल तालुका हा डोंगरी तालुका असुन , यावर्षीच्या अत्यल्प पर्जन्यमानामुळे खरीप हंगामातील भात, सोयाबीन, भुईमूग, नाचणी, ऊस तसेच इतर पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्याअभावी करपून वाळून गेली असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

तालुक्यामध्ये साधारण २४ ऑगस्ट २०२६ पासून महिनाभर पावसाने उघडीप दिलेने खरीप पिकांच्या उत्पादनात ८०% इतकी घट होणार आहे हि बाब चिंताजनक आहे.  पर्जन्यावर अवलंबून असलेली सध्याची पिके हि काढणी अयोग्य झालेली आहेत. तसेच सिंचनाखाली असलेल्या पिकांचेही उत्पादन घटले आहे. विशेषतः डोंगरी व पावसावर अवलंबून असलेल्या क्षेत्रातील परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे निवेदनात सांगण्यात आले आहे.
  

 यासंदर्भात मा.जिल्हाधिकारी कोल्हापूर, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर तसेच मा.तहसीलदार, कागल यांना निवेदन देण्यात आले असून, कागल तालुक्यातील सद्यस्थितीची तातडीने वस्तुनिष्ठ पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
    कागल तालुक्यातील विविध भागांमध्ये पावसाचे प्रमाण, पिकांची वाढ, उत्पादनक्षमता तसेच पिकांवर झालेला परिणाम याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे पीक परिस्थिती व पिकांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षण तातडीने करण्यात यावे, अशी मागणीही  करण्यात आली आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या :
▶️ कागल तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीमध्ये तातडीने समावेश करून दुष्काळी तालुका घोषित करण्यात यावा.
▶️    कागल तालुक्यातील सर्व महसूल मंडळनिहाय पर्जन्यमान, पीक परिस्थिती व पिकांच्या नुकसानीचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे व सर्वेक्षण करण्यात यावे.
▶️    दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित केल्यानंतर शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई, दुष्काळी सवलती, कृषी निविष्ठा व इतर अनुज्ञेय मदत तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी.
▶️    पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी व चारा यासाठी पूर्वनियोजन करून आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात.
▶️    आगामी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना आवश्यक त्या कृषीविषयक सवलती व मदत उपलब्ध करून देण्यात यावी.
▶️    कागल तालुक्याची सद्यस्थिती प्रत्यक्ष पाहण्यासाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे विशेष पथक पाठवून प्रत्यक्ष पाहणी व वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यात यावा.

कागल तालुक्यातील शेतकरी, पशुपालक व ग्रामीण जनतेच्या हिताचा विचार करून शासनाने या मागणीची गंभीरपणे दखल घेऊन कागल तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्याबाबत सकारात्मक व तातडीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी पंचायत समिती कागलच्या सभापती, उपसभापती व सर्व सन्माननीय सदस्यांनी केली आहे.


कागल तालुक्याचाही दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करावा पंचायत समिती कागलच्या सभापती, उपसभापती व सदस्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व तहसीलदार कागल यांच्याकडे निवेदन
Total Views: 19