शैक्षणिक
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात कॉमर्स फोरम २०२६–२७ व भित्तीपत्रकाचे उद्घाटन उत्साहात.
By nisha patil - 7/31/2026 1:47:15 PM
Share This News:
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात कॉमर्स फोरम २०२६–२७ व भित्तीपत्रकाचे उद्घाटन उत्साहात.
"वाणिज्य शाखा ही करिअरच्या अमर्याद संधींचे प्रवेशद्वार" – डॉ. वर्षा मैंदर्गी
कोल्हापूर : श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या वाणिज्य विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. ३० जुलै २०२६ रोजी कॉमर्स फोरम २०२६–२७ चे उद्घाटन तसेच "वाणिज्य शाखेचा अभ्यास का करावा?" या विषयावरील भित्तीपत्रकाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या प्रसंगी डी. आर. के. कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूरच्या प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या "वाणिज्य शाखेचा अभ्यास का करावा?" या विषयावरील भित्तीपत्रकाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कॉमर्स फोरमच्या नामफलकाचेही उद्घाटन करण्यात आले.श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या उपक्रमास मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण हे होते.
वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. संतोष कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना कॉमर्स फोरमची उद्दिष्टे, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी व करिअर घडविण्यासाठी वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. एम. एस. शिंदे यांनी करून दिला.
आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात डॉ. वर्षा मैंदर्गी म्हणाल्या, "आजच्या स्पर्धात्मक युगात वाणिज्य शाखा ही केवळ पदवी मिळविण्याचे माध्यम नसून करिअरच्या अमर्याद संधींचे प्रवेशद्वार आहे. ज्ञानासोबत कौशल्ये आत्मसात करणारा विद्यार्थीच भविष्यात यशस्वी ठरतो." त्यांनी लेखाशास्त्र, बँकिंग, वित्त, करव्यवस्था, व्यवस्थापन, उद्योजकता, डिजिटल अर्थव्यवस्था, चार्टर्ड अकाउंटन्सी, कंपनी सेक्रेटरी, कॉस्ट अकाउंटन्सी आदी क्षेत्रांतील करिअरच्या संधींचा आढावा घेत विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने वाटचाल करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, संगणकीय कौशल्ये, संवादकौशल्य आणि व्यावसायिक नैपुण्य विकसित करून स्वतःचे करिअर उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन केले.
यावेळी महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री. एम. व्ही. भोसले, स्टाफ सेक्रेटरी डॉ. के. एम. देसाई, IQAC समन्वयक डॉ. आर. डी. मांडणीकर, सहसमन्वयक डॉ. ए. बी. बलुगडे, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि वाणिज्य विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सी. के. पाटील व प्रा. उज्वला पाटील यांनी केले, तर प्रा. सायली पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. एन. व्ही. पाटील, प्रा. जी. आय. नाईक, प्रा. बी. के. कुंभार तसेच वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात कॉमर्स फोरम २०२६–२७ व भित्तीपत्रकाचे उद्घाटन उत्साहात.
|