बातम्या

गोकुळच्या निवडणुकीत छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला मिळालेले 'कप-बशी' हे चिन्ह कायदेशीरच!

The Cup and Saucer symbol allotted to the Chhatrapati Shahu Shetkari Vikas Aghadi


By nisha patil - 10/10/2026 3:14:49 PM
Share This News:



गोकुळच्या निवडणुकीत छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला मिळालेले 'कप-बशी' हे चिन्ह कायदेशीरच!
​             
विश्वास नारायण पाटील व अरुण डोंगळे यांचे स्पष्टीकरण
          
विरोधी आघाडीचे आरोप म्हणजे कायद्याचे अज्ञान

​           
कोल्हापूर, दि. १०: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत आमच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला 'कप-बशी' हे निवडणूक चिन्ह मिळालेले आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम २०१४, रुल २५ नुसार दिनांक  दि. ०८/१०/२०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत पात्र झालेले उमेदवार हे माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणूक लढवण्यासाठी पात्र उमेदवार म्हणून कायद्याने निश्चित होतात. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांकडे केलेल्या अर्जानुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यानुसार चिन्ह देण्याची कायदेशीर तरतूद आहे. 
         
छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्यावतीने उमेदवार विश्वास नारायण पाटील- आबाजी व अरुण गणपतराव डोंगळे यांनी हे प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
                        
या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे, मंगळवार, दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारीची अंतिम मुदत होती. अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीनंतर २५ जागांसाठी एकूण ५० उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले. त्यापैकी छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या नावाने २५ उमेदवारांनी एकत्रितरित्या दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन ई- मेलवर कपबशी या चिन्हाची मागणी करणारा अर्ज ईमेल  व दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी प्रत्यक्ष भेटून  'कप-बशी' या चिन्हाची मागणी करणारा लेखी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांच्या हातात सुपूर्द केला व पोहोच घेतली. सदर अर्जामध्ये निवडणूक लढविणाऱ्या २५ उमेदवारांच्या एकत्रित स्वाक्षरी असून त्यांच्या नामनिर्देशन पत्रामध्ये त्यांनी प्रथम प्राधान्याने कपबशी चिन्हाची मागणी केलेली आहे. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी आमचा अर्ज मान्य करून कपबशी चिन्ह देण्यात आले. 
​                    
दरम्यान, विरोधी आघाडीने दि. २४/०९/२०२६ रोजी छाननी झाल्यानंतर दहा आणि  दि. ०८/१०/२०२६ रोजी माघारीची मुदत संपल्यानंतर १५ उमेदवारांच्या सहीनिशी, असे दोन अर्ज सादर केलेले होते. हे दोन्ही अर्ज परिपूर्ण नव्हते. दोन्ही अर्जांवर २५ उमेदवारांच्या एकत्रित स्वाक्षऱ्या नव्हत्या. त्यामुळे, विरोधी आघाडीचे हे दोन्हीही अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळले. दरम्यान; दुसऱ्या दिवशी दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी वेळ निघून गेल्यानंतर  २५ जणांच्या सहीचा अर्ज दिला. त्यामुळे, विरोधी आघाडीचा हा अर्जही फेटाळण्यात आला. 
              
छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचा दि. ८/१०/२०२६  रोजीचा एकत्रित २५ उमेदवारांचा अर्ज हा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य  या कायद्यातील तरतुदीनुसार कपबशी हे चिन्ह मान्य करून कपबशीची हे चिन्ह देण्यात आले. या चिन्हावरून विरोधी आघाडीने केलेले आरोप म्हणजे त्यांचे कायद्याचे अज्ञान आहे, असे स्पष्टीकरण विश्वास नारायण पाटील आबाजी व अरुण डोंगळे यांनी केले आहे. 


गोकुळच्या निवडणुकीत छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला मिळालेले 'कप-बशी' हे चिन्ह कायदेशीरच!
Total Views: 19