विशेष बातम्या
महापालिकेच्यावतीने शहरात 4830 नागरीकांची तपासणी
By nisha patil - 5/29/2025 9:14:44 PM
Share This News:
महापालिकेच्यावतीने शहरात 4830 नागरीकांची तपासणी
कोल्हापूर ता.29 : शहर परिसरामध्ये किटकजन्य व जलजन्य दुषित पाण्याचे आजाराचे प्रमाण वाढत असल्याने महानगरपालिकेच्या साथरोग विभागामार्फत शहरामध्ये सर्व्हेक्षण सुरु केले आहे. यामध्ये आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून प्रामुख्याने काविळ, डेंग्यू या आजाराची तपासणी करण्यात येत आहे. गुरुवारी या सर्व्हेक्षणामध्ये 4830 नागरीकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 2 तापाचे रुग्ण आढळुन आले व त्यांचे रक्तजल नमुने सीपीआर लॅब या ठिकाणी तपासणी करीता पाठविण्यात आले. या सर्व्हेक्षणात 1111 घरांची तपासणी केले असता त्यामध्ये 3 घरांमध्ये डेंग्यु डासाच्या अळया आढळुन आल्या. ज्या घरामध्ये डासांच्या अळया आढळुन आल्या त्या घरातील कंटेन त्वरीत कोरडे करण्यात आले. यावेळी आशा वर्कर्समार्फत डेंग्यू सर्व्हे करताना त्या परिसरामध्ये जनजागृती करण्यात आली.
हा सर्व्हे राजारामपुरी यादवनगर, शाहूनगर, शाहुपुरी, मातंग वसाहत, बागल चौक, दौलतनगर, जागृतीनगर , प्रतिभानगर, सम्राटनगर, शास्त्रीनगर, पंजरपोळ, तवना पाटणे, राजेंद्रनगर, नेहरूनगर, जवाहरनगर, सुभाषनगर, मोतीनगर, वर्षानगर, रामानंदनगर, जरगनगर, साळुखेनगर, खाणभाग, एसएससी बोर्ड, सदरबाजार, काटे माळ, मलगल्ली, बापट कॅम्प, महालक्ष्मीनगर, मुक्तसैनिक वसाहत, पन्हाळनगर, पंढरपूर कॉलनी, रचनाकर हाऊसिंग सोसायटी, सुर्वेनगर, बापूरमनगर, प्रथमेशनगर, देवकरपानंद, जनदत्तनगर, पाचगाव रोड, अनंत प्राइड, जेल प्रिसार, साळोखेनगर, शिवगंगा कॉलनी, हडको कॉलनी, जीवबानाना जाधव पार्क या परिसरात करण्यात आला.
डेंग्यु डासांची उत्पत्ती व त्याच्यावर करावयाच्या उपाययोजना
डेंग्यु हा आजार एडीस इजिप्ती या मादी डासाच्या चावण्यामुळे होतो. हा डास दिवसा चावणारा असून या डासाची उत्पत्ती घरातील व परीसरातील भांडी, टाक्या व टाकाऊ वस्तु यात साठविलेल्या अथवा साठलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होतो. तसेच हा डास 3 ते 5 किलोमीटर भागामध्ये प्रवास करु शकतो. साधारणपणे अळयांचे रुपांतर डासामध्ये 8 ते 10 दिवसात होत असते. डासांचे जिवनचक्र खंडीत होण्याकरीता (अळयांचे रुपांतर डासांमध्ये होणेसाठी) आठवडयातून एकदा कोरडा दिवस पाळणे अती आवश्यक आहे. त्याकरीता घरामधील स्वच्छ पाणीसाठे (फुलदाण्या, फ्रिज, कुलर) यामधील पाणी आठवडयातून एकदा रिकामे करावे. डेंग्यु डास हा दिवसा चावणारा असून, रात्री विश्रांती घेतो. त्यामुळे दिवसा डास चावू नये याकरीता दक्षता घेणे आवश्यक आहे. डासाची संख्या कमी करण्यासाठी डासांच्या उत्पत्तीची स्थाने नष्ट करणे आवश्यक आहे. त्यासाठी आठवडयातुन एक दिवस कोरडा दिवस पाळावा तसेच तापाच्या रुग्णांनी महापालिकेच्या जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
महापालिकेच्यावतीने शहरात 4830 नागरीकांची तपासणी
|