बातम्या

भुदरगड तालुक्यात करडवाडीमध्ये ‘एक गाव एक गणपती’ची प्राणप्रतिष्ठा भक्तीमय वातावरणात

The One Village One Ganapat


By nisha patil - 8/27/2025 4:18:57 PM
Share This News:



 भुदरगड तालुक्यात करडवाडीमध्ये ‘एक गाव एक गणपती’ची प्राणप्रतिष्ठा भक्तीमय वातावरणात

भुदरगड प्रतिनिधी करडवाडी (ता.२७ ऑगस्ट) –प्रकाश खतकर ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात बुधवारी सकाळपासूनच घराघरांत गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दिवसभर वाजतगाजत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती गावात दाखल होत राहिल्या आणि गणेशोत्सवामुळे करडवाडीसह परिसरात उत्साहाचे वातावरण पसरले.

करडवाडीतील उत्कर्ष तरुण मंडळाने यावर्षी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली असून, रमेश धोंडीराम निकाडे यांनी यंदा गणेशमूर्ती अर्पण केली आहे. विशेष म्हणजे गेली ४३ वर्षे गावात ‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमांतर्गत प्राणप्रतिष्ठा केली जात आहे.

मंडळाचे अध्यक्ष मयूर महादेव पाटील, उपाध्यक्ष दत्तात्रय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत गावातील तरुण मंडळाचे कार्यकर्ते भजन म्हणत, तर महिलांनी फुगडीचा फेर धरत विठ्ठल मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. भक्तीमय वातावरणात झालेल्या या सोहळ्याला बजरंग सुतार, सदाशिव बेलेकर, प्रकाश बेलेकर, संभाजी खतकर, उत्तम मोरे, महादेव पाटील, बाबुराव खतकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बेलेकर म्हणाले, “गणेशोत्सव हा फक्त उत्सव नसून गावाची एकात्मता, बंधुता आणि संस्कृती जपणारा सण आहे. गेली चार दशके करडवाडी गावाने ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा जपली आहे. ही परंपरा कायम राहावी, तरुण पिढीने यात सक्रिय सहभाग घ्यावा हीच अपेक्षा आहे.”

गणेशभक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे करडवाडी गावात गणेशोत्सवाची रंगत अधिक खुलली आहे.

 


भुदरगड तालुक्यात करडवाडीमध्ये ‘एक गाव एक गणपती’ची प्राणप्रतिष्ठा भक्तीमय वातावरणात
Total Views: 78