विशेष बातम्या

महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार, जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहणार, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास

The alliance will fight the municipal elections togethe


By nisha patil - 12/15/2025 6:02:53 PM
Share This News:



महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार, जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहणार, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने निवडणूक लढवण्याकरता मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. गेल्या दोन दिवसात ३५० पेक्षा अधिक इच्छुकांच्या मुलाखती आपण घेतल्या आहेत. निवडून येण्याची क्षमता असणार्‍या उमेदवारालाच पक्षाच्या वतीने संधी दिली जाईल, असे खासदार धनंजय महाडिक यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. उमेदवारी वरून पक्षांमध्ये कोणतीही बंडखोरी होणार नाही किंवा नाराजी राहणार नाही, असा विश्वासही खासदार महाडिक यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहील, असेही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले.
 

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज मागितलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती गेले दोन दिवस खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव यांनी घेतल्या. आज या मुलाखतीच्या दरम्यान खासदार महाडिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यामध्ये पक्षाकडे उमेदवारी अर्ज मागणार्‍यांची संख्या पाहून आपण भारावून गेलो आहे. त्यातून भाजपबद्दल जनतेमध्ये असणारा विश्वास व्यक्त होत आहे, असे खासदार महाडिक यांनी नमूद केले. निवडून येण्याची क्षमता असणार्‍या उमेदवारालाच संधी दिली जाईल.

मात्र त्यातून अन्य उमेदवारांमध्ये कोणत्याही प्रकारची बंडखोरी किंवा नाराजी निर्माण होणार नाही, असा विश्वास आहे. पक्षाने जाहीर केलेल्या अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी तसेच त्याच्या विजयासाठी सर्वजण झोकून देऊन काम करतील, असे खासदार महाडिक यांनी सांगितले. सर्व उमेदवारांच्या मुलाखतींचा अहवाल राज्यस्तरीय कोअर कमिटीकडे पाठवला जाईल. त्यानंतर चार-पाच दिवसात उमेदवारी संबंधित चित्र स्पष्ट होईल, असे खासदार महाडिक यांनी सांगितले.   काही अपवादात्मक ठिकाणी ताराराणी आघाडीकडून उमेदवार उभे राहण्याची शक्यता आहे. मावळत्या सभागृहातील कॉंग्रेसच्या पूर्वीच्या जागांवर महायुती दावा करणार आहे. कॉंग्रेसच्या या जागांचे महायुती मधील घटक पक्षांमध्ये समान वाटप होईल. महायुती मधील जागा वाटपाबद्दल उलट सुलट चर्चा सुरू असल्या तरी जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहील, असेही खासदार महाडिक यांनी नमुद केले. कोल्हापूर महापालिकेत १५ वर्षे कॉंग्रेस पक्षाची सत्ता होती.

मात्र कोल्हापूर शहराचा विकास झाला नाही. उलट महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या माध्यमातून शहराच्या विकासाने गती घेतली. रखडलेले प्रकल्प मार्गी लागले, असेही खासदार महाडिक यांनी सांगितले. कोल्हापूर महापालिका निवडणूकीतील जागा वाटपांबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह प्रमुख नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे.

नव्या जुन्या कार्यकर्त्यांची सांगड घालत, उमेदवारी देताना समतोल साधला जाईल. तसेच निवडणुकीत तरुण युवकांना मोठ्या प्रमाणावर उमेदवारी देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे २५ ते ३० टक्के जागावर युवा पिढीला संधी दिली जाईल, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.


महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार, जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहणार, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास
Total Views: 66