बातम्या
आरोग्यरक्षक राखी’ स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न*
By nisha patil - 11/24/2026 6:17:11 PM
Share This News:
आरोग्यरक्षक राखी’ स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न*
*आजरा(हसन तकीलदार: समाजात आरोग्यविषयक जनजागृती व्हावी या उद्देशाने तळागाळात अविरत सेवा देणाऱ्या आशा स्वयंसेविकांच्या कर्तृत्वाचा गौरव होऊन त्यांना अधिक बळ मिळावे, या हेतूने दैनिक तरुण भारत आणि आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आरोग्यरक्षक राखी’ स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजल्यावरील सभागृहात मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री नाम.प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गौरव सोहळा संपन्न झाला.
रक्षाबंधनाचे औचित्य साधून हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत ‘स्त्री भ्रूण हत्या विरोधात जनजागृती’ करणारे प्रभावी संदेश देणाऱ्या राख्या साकारण्याचे आवाहन करण्यात आले होते. या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या स्पर्धेला जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी उत्स्फूर्त व भरघोस प्रतिसाद दिला.
या स्पर्धेत आजरा तालुक्याने उल्लेखनीय यश संपादन केले असून प्राथमिक आरोग्य केंद्र, मलिग्रे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) अंतर्गत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका सौ. सायली सुनील पालकर (मु. हारूर, पो. कानोली, ता. आजरा, जि. कोल्हापूर) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच पारेवाडी उपकेंद्राच्या आशा स्वयंसेविका सौ. वनिता गोपाळ गडकरी यांनी तृतीय क्रमांक पटकावत आजरा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या बद्दल पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.
उत्कृष्ट व वैशिष्ट्यपूर्ण राख्या तयार करणाऱ्या विजेत्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना मान्यवरांच्या हस्ते पैठणी साडी, गोल्ड प्लेटेड नोट व सन्मानपत्र देऊन विशेष सन्मानित करण्यात आले. याशिवाय कार्यक्रमात सर्व उपस्थित आशा स्वयंसेविकांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला, तर स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षिसांनी गौरव करण्यात आला.
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सोहळ्यास पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह दैनिक तरुण भारतचे वितरण व्यवस्थापक अमर पाटील, आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी, विविध तालुक्यांचे तालुका आरोग्य अधिकारी, तालुका समूह संघटक, गटप्रवर्तक तसेच जिल्ह्यातून मोठ्या संख्येने आलेल्या आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.
आरोग्यरक्षक राखी’ स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न*
|