विशेष बातम्या
‘जिल्हा शिक्षक व मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार
By nisha patil - 6/10/2025 5:36:33 PM
Share This News:
देशात ‘प्रथम’ येण्याचा कोल्हापूरचा निर्धार — पालकमंत्री प्रकाश आबिटकर
‘जिल्हा शिक्षक व मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गेल्या दोन वर्षांत विविध शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. आता पंजाबमधील बरनाला जिल्ह्याला मागे टाकत देशात प्रथम येण्याचा संकल्प करूया, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
महसैनिक दरबार हॉल येथे झालेल्या ‘जिल्हा शिक्षक पुरस्कार २०२४-२५ व २०२५-२६’ तसेच ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, “पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे. या सन्मानामुळे शिक्षणात गुणवत्ता वाढविण्याची चळवळ निर्माण होते. पुढील वर्षापासून शिक्षक पुरस्कार शिक्षक दिनीच वितरित केले जातील.” त्यांनी पुढे सांगितले की, “माझी शाळा, सुंदर शाळा” या अभियानामुळे शिक्षण क्षेत्रात लोकचळवळ उभी राहिली असून, जिल्ह्यातील शाळांच्या विकासासाठी तब्बल ११० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.”
या प्रसंगी आमदार अशोकराव माने, माजी जि. प. सदस्य प्रसाद खोबरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. मीना शेंडकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुवर्णा सावंत, लेखाधिकारी अतुल आकुर्डे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, उपशिक्षणाधिकारी रत्नप्रभा दबडे व रामचंद्र कांबळे, अधीक्षक रवींद्र ठोकळ आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात जिल्हा पुरस्कारप्राप्त शिक्षकांसह राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार विजेते रविंद्र केदार (सरनोबतवाडी) व दत्तात्रय घुगरे (यादववाडी) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी प्रास्ताविकात सांगितले की, “कोल्हापूरला चित्रनगरीसोबतच शिक्षणनगरी म्हणून देशभरात ओळख मिळाली आहे. मिशन अंकुर, मिशन उत्कर्ष, नो मोर बॅक बेंचर्स, निपुण एआय ॲप आणि सीसीटीव्ही प्रणाली या उपक्रमांनी शिक्षण क्षेत्रात नवे पर्व सुरू केले आहे.”
कार्यक्रमात ई-जीपीएफ संगणक प्रणालीचे अनावरण करण्यात आले. या प्रणालीमुळे शिक्षकांना जीपीएफ स्लिप थेट मोबाईलवर मिळणार असून, एक हजार कोटी रुपयांचे लेखांकन या प्रणालीद्वारे पूर्ण झाल्याची माहिती अतुल आकुर्डे यांनी दिली.
कार्यक्रमाच्या समारोपाला उपस्थितांनी शिक्षकांच्या कार्याचे आणि शिक्षण विभागाच्या कामगिरीचे कौतुक करत “देशात प्रथम क्रमांक मिळवूया!” या निर्धाराला टाळ्यांच्या गजरात पाठिंबा दिला.
सूत्रसंचालन संदीप मगदुम आणि सविता कुंभार यांनी केले.
‘जिल्हा शिक्षक व मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार
|