बातम्या
कडलगेची कन्या डॉ. नेहा शिरुर यांचे देदीप्यमान यश
By nisha patil - 4/3/2026 11:54:37 AM
Share This News:
कडलगेची कन्या डॉ. नेहा शिरुर यांचे देदीप्यमान यश
कडलगे पंचक्रोशीत दुहेरी वैद्यकीय पदवी मिळवणाऱ्या ठरल्या पहिल्या डॉक्टर
आजरा (हसन तकीलदार ) :-जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर ग्रामीण भागातील गुणवत्ता कशी चमकू शकते, याचे उत्तम उदाहरण कडलगे (ता. गडहिंग्लज) येथील डॉ. नेहा शिरूर यांनी घालून दिले आहे. मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमडी (Anesthesia) हा पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रथम श्रेणीत उत्तीर्ण करून केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण गडहिंग्लज तालुक्याचे नाव त्यांनी सुवर्ण अक्षरात कोरले आहे.
डॉ. नेहा यांनी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोल्हापूर येथील होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी एम. एच. टी. सी.इ. टी. 2016 साली 200 पैकी 180 गुण प्राप्त करून कोल्हापूरच्याच राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस.ची पदवी प्राप्त केली. आता एम.डी.परीक्षेत प्रथम श्रेणित उत्तीर्ण होऊन एम.डी.सारखी उच्च पदवी संपादन करून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील आपला प्रवास अधिक सक्षम केला आहे. विशेष म्हणजे, कडलगे पंचक्रोशीतून शासकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस.आणि एम.डी.या दोन्ही पदव्या मिळवणाऱ्या त्या पहिल्याच डॉक्टर ठरल्या आहेत.
डॉ. नेहा यांना हा यशाचा वारसा त्यांच्या कुटुंबातूनच लाभला आहे. त्या गावचे माजी पोलीस पाटील कै. बाबुराव
शिरूर यांच्या नात, प्रगतशील शेतकरी चंद्रकांत शिरूर यांच्या कन्या, तसेच माजी सरपंच व ज्येष्ठ नेते सतीश शिरूर यांच्या पुतणी आहेत. तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच सुशीला सतीश शिरूर यांच्याही त्या पुतणी आहेत. विशेष म्हणजे त्यांचे वडील चंद्रकांत शिरूर हे ही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथून बी.ई. मेकॅनिक इंजिनिअर आहेत एका प्रतिष्ठित आणि सामाजिक भान असलेल्या कुटुंबातील या कन्येने मिळवलेल्या यशामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
नुकताच मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिकृत दीक्षांत समारंभ पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. नेहा यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशामागे त्यांचे अथक परिश्रम, विषयाची सखोल ओढ आणि कुटुंबाकडून मिळालेले खंबीर पाठबळ असल्याचे बोलले जात आहे.**ग्रामीण भागातील मुलींनी जिद्दीने शिक्षण घेतले तर त्या कोणत्याही शिखरावर पोहोचू शकतात, हेच डॉ. नेहा शिरूर यांनी सिद्ध केले आहे.ग्रामीण भागातील मुलींना डॉ. नेहा या आदर्श बनतील यात शंका नाही.*
यशाबद्दल डॉ. नेहा शिरूर यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कडलगेची कन्या डॉ. नेहा शिरुर यांचे देदीप्यमान यश
|