ताज्या बातम्या
जय जय राम कृष्ण हरीच्या गजरात शेंडूर नगरी दुमदुमली
By nisha patil - 1/15/2026 12:27:28 PM
Share This News:
शेंडूर | प्रतिनिधी : अजित बोडके
शेंडूर (ता. कागल) येथे परंपरेनुसार साजऱ्या होणाऱ्या हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. गेल्या ८ दिवसांपासून प्रवचन सेवा व कीर्तन सेवा अखंड सुरू होती.
दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी दिंडी सोहळ्याने सप्ताहाची सांगता करण्यात आली. सकाळी ९ वाजता शेंडूर गावातील प्रमुख रस्त्यांवरून दिंडी मार्गस्थ झाली. “जय जय राम कृष्ण हरी”च्या गजरात संपूर्ण शेंडूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
या दिंडी सोहळ्याला वारकरी संप्रदायातील लहान-थोर भाविकांसह शेंडूर परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दिंडी सोहळ्याची सांगता महाप्रसाद वितरणाने करण्यात आली. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
शेंडूर येथील हरिनाम सप्ताहाला १६३ वर्षांची अखंड परंपरा असून, या सप्ताहात ७ दिवस ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तनाचे कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने पार पडतात. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार व वारकरी संप्रदायाच्या सहभागाने सातही दिवस भक्तीची पर्वणी अनुभवायला मिळते.
जय जय राम कृष्ण हरीच्या गजरात शेंडूर नगरी दुमदुमली
|