बातम्या

"सामान्य माणूस हाच बसवण्णांच्या चळवळीचा केंद्रबिंदू" — बसव कथाकार शिवानंद हैबतपूरे यांचे प्रतिपादन

The common man is the center of Basavanna


By nisha patil - 4/26/2025 2:44:15 PM
Share This News:



"सामान्य माणूस हाच बसवण्णांच्या चळवळीचा केंद्रबिंदू" — बसव कथाकार शिवानंद हैबतपूरे यांचे प्रतिपादन

दत्तवाड (ता. शिरोळ) येथे आयोजित भव्य बसवकथा सोहळ्याच्या पहिल्या दिवशी सुप्रसिद्ध बसव कथाकार शिवानंद हैबतपूरे यांनी महात्मा बसवेश्वरांचे विचार प्रभावीपणे मांडले. "सामान्य माणूस हाच बसवण्णांच्या चळवळीचा केंद्रबिंदू होता," असे स्पष्ट करत त्यांनी बसवण्णांच्या कार्याचे महत्त्व उलगडले.

ते पुढे म्हणाले, “भारत ही महापुरुषांची भूमी असून भगवान महावीर, बुद्ध, नानक, ज्ञानेश्वर, तुकाराम, शाहू, फुले, आंबेडकर, विवेकानंद यांच्या परंपरेत महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात भक्तीप्रधान समतेची क्रांती घडवून आणली. जात-पात, वर्ग, वर्णभेद झुगारून एकसंघ शरण समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी ‘जंगम’ व्यवस्था उभारली.”

सामाजिक समतेचे महानायक

हैबतपूरे पुढे म्हणाले की, “बसवण्णांनी अस्पृश्यता, अंधश्रद्धा, स्त्रीशोषण, बळीप्रथा यांसारख्या विकृतींना मूठमाती दिली. त्यांनी स्त्रीपुरुष समानतेसाठी लहान वयातच गृहत्याग केला आणि स्त्री मुक्तीची बीजं पेरली. आज धर्मांधता व जातिद्वेषाचे सावट गडद झाले असताना बसवण्णांचे विचारच समाजाला दिशा देणारे ठरतील.”

भव्य सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

दत्तवाड येथील श्री सद्गुरू बाबा महाराज आश्रमाचे प. पू. ऋषिकेशानंद बाबा महाराज यांच्या हस्ते बसवकथेच्या पहिल्या पुष्पाचे उद्घाटन झाले. पंचक्रोशीतील बसवभक्त मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.

दि. 25 ते 29 एप्रिल दररोज संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत बसवकथेचे सत्र पार पडत असून याचे संगीत संयोजन पं. चंद्रकांत तोरकडे, सुरमणी नामदेव डोणगावे, श्री. बाबुराव कोकणे आणि श्री. अनिल कुंभार यांनी केले आहे.

या बसवकथेचे आयोजन म. बसवेश्वर जयंती उत्सव कमिटी दत्तवाड, लिंगायत समाज आणि समस्त ग्रामस्थ दत्तवाड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. कथा प्रवचनानंतर अन्नदासोह प्रसादाची उत्तम सोय करण्यात आली आहे.


"सामान्य माणूस हाच बसवण्णांच्या चळवळीचा केंद्रबिंदू" — बसव कथाकार शिवानंद हैबतपूरे यांचे प्रतिपादन
Total Views: 145