बातम्या
कागलमध्ये देशातील एक नंबर जैवविविधता उद्यान साकारणार!
By nisha patil - 10/17/2025 3:32:38 PM
Share This News:
कागलमध्ये देशातील एक नंबर जैवविविधता उद्यान साकारणार!
किर्लोस्कर ऑईल इंजिन्सच्या सीएसआर फंडातून 140 एकरात वृक्षांचे संवर्धन
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ
कागल, दि. १७ : 8कै. उत्तमराव पाटील उद्यानात देशातील एक नंबर जैवविविधता परिसर साकारला जाणार आहे. किर्लोस्कर ऑईल इंजिन्स कंपनीच्या सीएसआर फंडातून 140 एकरांमध्ये नष्ट होत चाललेल्या वृक्षांचे संगोपन करण्यात येणार असून, हा प्रकल्प देशातील एक आदर्श पर्यटन केंद्र ठरेल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
कागल नगरपरिषद, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स व सार्थ एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रकल्पाचा शुभारंभ लक्ष्मी टेकडीजवळ करण्यात आला.
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, “नगरपालिकेने फॉरेस्ट विभागाला 140 एकर जमीन दिली होती, मात्र शासनाने प्रकल्प बंद केल्यानंतर त्याचे संवर्धन शक्य नव्हते. त्यामुळे सीएसआर फंडातून या परिसराचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला. किर्लोस्कर कंपनीने पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.”
ते पुढे म्हणाले, “किर्लोस्कर कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत तीन वर्षांसाठी करार केला आहे. या काळात उद्यानाचा विकास समाधानकारक झाला तर पुढील 30 वर्षांसाठी करार कायम ठेवू.”
किर्लोस्कर कंपनीचे एचआर हेड वीरेंद्र गायकवाड यांनी सांगितले की, कंपनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत आली आहे आणि कागल नगरपरिषदेला संपूर्ण सहकार्य देईल.
सामाजिक बांधिलकी अधिकारी शरद आजागेकर यांनी माहिती दिली की, उद्यानाचे काम तीन टप्प्यात होईल — साफसफाई, नादुरुस्त मशिन्सची दुरुस्ती व नव्या झाडांची लागवड. “किर्लोस्कर परिसरासारखेच हे उद्यानही नटवू आणि देशातील सर्वोत्तम जैवविविधता उद्यान म्हणून ओळख मिळवू,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, साईट लिडर सुरेश मगदूम, जी.एम. एचआर हरिष सायवे, सार्थ एज्युकेशन सोसायटीचे डॉ. दिलीप माळी, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्वागत नितीन कांबळे यांनी केले, प्रास्ताविक अजय पाटणकर यांनी केले, सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले, तर आभार राजाराम गुरव यांनी मानले.
कागलमध्ये देशातील एक नंबर जैवविविधता उद्यान साकारणार!
|