बातम्या

कोल्हापुरात ‘चुटकीबाबा’चा घाणेरडा चेहरा उघड!

The dirty face of Chutki Baba exposed in Kolhapur


By nisha patil - 11/23/2025 5:36:30 PM
Share This News:



कोल्हापुरात ‘चुटकीबाबा’चा घाणेरडा चेहरा उघड! मानसिक शोषणातून सेक्स रॅकेटपर्यंत सनी भोसलेचे कारनामे

कौटुंबिक कलह, वैवाहिक वादाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या महिलांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेत भोंदूगिरी करत त्यांचे मानसिक आणि शारीरिक शोषण करणारा कथित चुटकीबाबा सनी भोसले हा आता एका भयंकर सेक्स रॅकेटचा सूत्रधार बनल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महिलांना ‘करनी’, ‘भूतबाधा’ दूर करण्याच्या बहाण्याने गळाला लावणारा हा बुवा प्रत्यक्षात वेश्या व्यवसाय चालवणारा दलाल बनला आहे.

व्हॉटस्अप ग्रुपच्या माध्यमातून सनी भोसले आर्थिकदृष्ट्या सधन कुटुंबातील अनेक महिलांना जाळ्यात ओढत होता. गंडेदोरे करणाऱ्या साध्या बुवापासून सुरू झालेला त्याचा प्रवास कोल्हापुरातील मोठ्या सेक्स रॅकेटपर्यंत पोहोचल्याने पोलिसांनीही धास्तावण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

फुलेवाडी रिंगरोडवरील क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसरात चार खोल्यांचे घर भाड्याने घेऊन सनी भोसले दरबार भरवत होता. कधी भगवी कफनी, कधी जीन्स-टीशर्ट, तर कधी त्रिशूल घेऊन ‘जय महाकाल’ अशी आरोळी ठोकत तो महिलांवर प्रभाव टाकायचा. याच घरावर दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अघोरी पूजेचे साहित्य, महिलांचे फोटो, विविध सिमकार्ड, गर्भनिरोधक साहित्य असे धक्कादायक साहित्य सापडले.

पतीचे दुर्लक्ष, कौटुंबिक वाद अशा तक्रारींसह त्याच्याकडे येणाऱ्या महिलांना प्रथम संमोहन, नंतर ‘समस्या सोडवतो’ असा विश्वास देत तो लैंगिक शोषणाच्या जाळ्यात ओढत होता. त्यानंतरच त्यांना बळजबरीने वेश्या व्यवसायात ढकलले जात असल्याचा पोलिसांना संशय आहे.

त्याने चालवलेल्या व्हॉटस्अप ग्रुपमध्ये चार पुरुषांशिवाय उरलेल्या अडीचशे महिला सधन कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली असून हे समाजासाठी अत्यंत चिंतेचे चित्र आहे.

सनीकडे सर्व मोबाईल असले तरी त्यातील सिमकार्ड मात्र महिलांच्या नावावर असल्याचे आढळले. ‘फोन हॅक होऊ शकतो’ असा खोटा बहाणा करून तो महिलांकडूनच सिमकार्ड घेऊन गुन्हेगारी कारभार सुरू ठेवत होता. वेश्या पुरवणे, फोटो पाठवणे, व्यवहार करणे—या सगळ्यांचा लगाम सनी भोसलेच्या हातात होता.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांनी वेगात सुरू केला असून अनेक नवे धागेदोरे पुढे येण्याची शक्यता आहे.


कोल्हापुरात ‘चुटकीबाबा’चा घाणेरडा चेहरा उघड!
Total Views: 73