बातम्या
कागल तालुका रास्त धान्य दुकानदार संघटनेची आठवी वार्षिक सभा उत्साहात संपन्न
By nisha patil - 10/29/2026 2:14:38 PM
Share This News:
कागल तालुका रास्त धान्य दुकानदार संघटनेची आठवी वार्षिक सभा उत्साहात संपन्न
तारा न्यूजसाठी प्रतिनिधी अजित बोडके कागल तालुका रास्त धान्य दुकानदार संघटनेची आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत संघटनेच्या वार्षिक कामकाजाचा आढावा घेण्यासह दुकानदारांच्या विविध सूचना आणि संघटनेच्या पुढील कार्याबाबत चर्चा करण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष संदीप लाटकर होते. संचालक दिनेश मुसळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सभेच्या प्रारंभी महाराष्ट्रातील दिवंगत नेते तसेच राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
संघटनेचे सचिव साताप्पा शेणवी यांनी सन २०२५-२६ चा वार्षिक अहवाल सादर केला. या अहवालावर झालेल्या चर्चेत अनेक संचालकांनी सहभाग घेत संघटनेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच आपली मते आणि सूचना मांडल्या. अध्यक्षीय मनोगतात संदीप लाटकर यांनी संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेतला. उपस्थित रास्त धान्य दुकानदारांच्या विविध सूचना ऐकून घेत, आगामी काळात संघटनेच्या माध्यमातून अधिक प्रभावी आणि चांगले काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या सभेला संघटनेचे उपाध्यक्ष संतोष सांगले, संचालक शंकर घाटगे, जयवंत निकम, अरविंद दंडवते, आर. आर. पाटील, नामदेव चौगुले, पुंडलिक कुदळे, सुनील साळुंखे, विनोद चौगुले, पांडुरंग निकम यांच्यासह तालुक्यातील रास्त धान्य दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार राजू जाधव यांनी मानले. सर्व पदाधिकारी आणि सदस्यांच्या उपस्थितीत सभा आनंदी व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
कागल तालुका रास्त धान्य दुकानदार संघटनेची आठवी वार्षिक सभा उत्साहात संपन्न
|