राजकीय

विकासाच्या मुद्द्यावर महायुतीचा ठाम विश्वास

The grand alliance has firm faith in the issue of development


By nisha patil - 5/1/2026 5:22:09 PM
Share This News:



कोल्हापूर:-कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला असून, आज छत्रपती शिवाजी पेठ परिसरात प्रभाग क्रमांक १० मधील महायुतीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेच्या माध्यमातून महायुतीच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत विकासाचा लेखाजोखा मांडला.

महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर शहरात राबविण्यात आलेली विविध विकासकामे—रस्ते सुधारणा, नागरी सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व मूलभूत सोयी-सुविधा—यांच्या जोरावर महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. विरोधकांकडून जाणीवपूर्वक पसरवण्यात येणाऱ्या निगेटिव्ह नरेटिव्ह आणि खोट्या टॅगलाईनला कोल्हापूरची जागरूक जनता बळी पडणार नाही, असेही मत यावेळी मांडण्यात आले.

पदयात्रेदरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांशी संवाद साधला. स्थानिक प्रश्न, विकासाच्या अपेक्षा आणि भविष्यातील योजनांबाबत चर्चा करण्यात आली. महायुतीच्या उमेदवारांनीही नागरिकांच्या समस्या समजून घेत त्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.

या पदयात्रेला शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. सुजित चव्हाण, महायुतीचे उमेदवार श्री. अजय इंगवले, ॲड. पूर्वा राणे, सौ. अर्चना कोराणे, श्री. महेश सावंत, युवासेना संपर्कप्रमुख श्री. प्रसाद चव्हाण, उपशहरप्रमुख श्री. प्रदीप उर्फ बंटी पाटील, श्री. उदय इंगवले, श्री. निखिल इंगवले, श्री. सार्थक पाटील, श्री. तेजस माने, श्री. सुधीर राणे, श्री. निखिल कोराणे, श्री. विजय सावंत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महायुतीचा विकासाचा अजेंडा, संघटनात्मक ताकद आणि जनतेचा विश्वास या त्रिसूत्रीच्या बळावर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत यश मिळणार असल्याचा आत्मविश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


विकासाच्या मुद्द्यावर महायुतीचा ठाम विश्वास
Total Views: 58