बातम्या
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य भिमा कृषी प्रदर्शन १३ फेब्रुवारीपासून; खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन
By nisha patil - 2/2/2026 6:23:37 PM
Share This News:
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य भिमा कृषी प्रदर्शन १३ फेब्रुवारीपासून; खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन
कोल्हापूर/प्रतिनिधी : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे भिमा कृषी व पशू प्रदर्शन २०२६ येत्या १३ ते १६ फेब्रुवारी दरम्यान मेरी वेदर मैदान, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून १७ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या प्रदर्शनात यंदा देश-विदेशातील नामांकित कृषी कंपन्या, आधुनिक तंत्रज्ञान, जातिवंत जनावरे व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रदर्शनातील खास आकर्षणांमध्ये कोल्हापुरात प्रथमच ५ फुटांचा इग्वाना (सरडा), बैलगाडा शर्यतीतील प्रसिद्ध हरण्या बैल, १२ लाखांचा खिल्लार खौंड, १४०० किलोचा मुरा रेडा, ३० लिटर दूध देणारी एच.एफ. गाय, अमेरिकन शेळ्या व बोकड यांचा समावेश आहे. सांगोला, दहिवडी येथील जातिवंत खिल्लार गायी-खोंड, परभणी, नांदेड, लातूर येथील लालकंधारी, देवणी, साहिवाल, गिर तसेच पंढरपुरी मुरा, मेहसाना व जाफराबादी म्हशी प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.
चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात शेतकऱ्यांना शेतीविषयक तज्ञांचे मार्गदर्शन, शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या योजना, एआय तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, मत्स्यपालनाची माहिती मिळणार आहे. यासोबतच तांदूळ महोत्सव, विविध बी-बियाणे, शेती अवजारे, सौरऊर्जा, पंपसेट्स, जैविक उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.
भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून २०० महिला बचत गटांच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार असून चारही दिवस शेतकऱ्यांसाठी मोफत झुणका-भाकरी दिली जाणार आहे. सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात शेतीभूषण, शेतीनिष्ठ, युवा, आदर्श शेतकरी व शेती तंत्रज्ञ पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य भिमा कृषी प्रदर्शन १३ फेब्रुवारीपासून; खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन
|