शैक्षणिक
📱 ‘अप्स’चा वाढता बोजा! शिक्षकांचा डोकादुखीचा विषय बनले डिजिटल अॅप्स
By nisha patil - 10/28/2025 1:36:20 PM
Share This News:
शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार राज्यातील सर्वच शाळांतील शिक्षकांना दररोज १५ ते २० मोबाइल अॅप्स वापरावे लागत आहेत. या अॅप्समधून विद्यार्थ्यांची उपस्थिती, शाळेची माहिती, अहवाल व आकडेवारी भरताना शिक्षकांचा बराच वेळ खर्च होत असून, त्यामुळे शिकविण्यासाठी कमी वेळ मिळतो आहे. “मोबाइलसोबत आता शिक्षकच हँग होत आहेत,” अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी दिली आहे.
‘दीक्षा’, ‘सरळ अॅप’, ‘यू-डाइस प्लस’, ‘शाळा सिद्धी’, ‘निपुण महाराष्ट्र’, ‘प्रेरणा शाळा संवाद’, ‘महाडीबीटी’, ‘उपस्थिती’, ‘समग्र शिक्षण पोर्टल’ आणि ‘शाळा पोषण’ अशी अनेक अॅप्स शिक्षकांच्या दैनंदिन कामाचा भाग झाली आहेत. परंतु, अॅप्स वारंवार हँग होणे, कमी वेळेत माहिती भरण्याचा दबाव आणि एकाच माहितीची पुनरावृत्ती यामुळे शिक्षकांमध्ये मानसिक ताण वाढल्याचे समोर आले आहे.
प्राथमिक शिक्षक समितीचे सरचिटणीस राजन कोरगावकर म्हणाले, “एकच माहिती दोन ते तीन वेळा अॅपमध्ये भरावी लागते. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये अंतर निर्माण होते आणि शैक्षणिक कामगिरीवर त्याचा परिणाम दिसून येतो.”
दुसरीकडे शिक्षण विभागाचे उपसंचालक राजेश कंकाळ यांनी सांगितले की, “वरिष्ठ पातळीवर सर्व डिजिटल कामाचे एकत्रीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही काळात ही प्रक्रिया पूर्ण होईल.”
शिक्षकांचे म्हणणे आहे की, सततच्या डिजिटल कामामुळे विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळच उरत नाही, त्यामुळे शिकविण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो आहे. शिक्षकांनी प्रशासनाला विनंती केली आहे की, अशा तांत्रिक कामांसाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, ज्यामुळे त्यांना अध्यापनावर लक्ष केंद्रित करता येईल.
📱 ‘अप्स’चा वाढता बोजा! शिक्षकांचा डोकादुखीचा विषय बनले डिजिटल अॅप्स
|