बातम्या
जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या शिष्टाईमुळे इंगळीतील आमरण उपोषणाची यशस्वी समाप्ती
By nisha patil - 8/15/2025 2:43:43 PM
Share This News:
जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या शिष्टाईमुळे इंगळीतील आमरण उपोषणाची यशस्वी समाप्ती
इंगळी ग्रामस्थांच्या पायाभूत सुविधांवरील गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे सातत्यपूर्ण दुर्लक्ष झाल्यामुळे 12 ऑगस्टपासून शिवसेना शहरप्रमुख केशव पाटील, सुरेश लोहार, सुलतान नाईकवडे, खानसाब नाईकवडे आणि निजाम पटेल यांनी सहामोट विहीर परिसरात बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला ग्रामस्थांचा दिवसेंदिवस मोठा पाठिंबा मिळत होता.
गावातील भूस्खलनग्रस्त रस्त्यांची पुनर्बांधणी, पाणीटंचाई निवारण, पर्यायी रस्त्यांची सोय व इतर मागण्यांवर तातडीने तोडगा निघावा, यासाठी हे आंदोलन उभारण्यात आले होते.
13 ऑगस्ट रोजी जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी उपोषणस्थळी भेट देऊन प्रशासनाला इशारा दिला की, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल. 14 ऑगस्ट रोजी झालेली ग्रामपंचायत व उपोषणकर्त्यांची बैठक निष्फळ ठरल्यानंतर चौगुले यांनी तत्काळ कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी संपर्क साधून ग्रामस्थांच्या समस्या ठामपणे मांडल्या.
पालकमंत्र्यांच्या तातडीच्या हस्तक्षेपानंतर अप्पर तहसीलदार महेश खिल्लारी, ग्रामसेवक हासुरे व सरपंच दादासो मोरे उपोषणस्थळी आले. काही मागण्या तात्काळ मान्य करण्यात आल्या तर उर्वरित मागण्यांवर वरिष्ठ पातळीवर लवकर बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले.
ग्रामस्थ व प्रशासन यांच्यातील संघर्ष टाळत, उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असतानाही चौगुले यांनी दुवा बनून उपोषण यशस्वीरीत्या समाप्त केले. याबद्दल ग्रामस्थ व पोलीस प्रशासनाने त्यांचे कौतुक केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरबत देऊन उपोषणाची समाप्ती करण्यात आली.
यावेळी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, उपसरपंच सौ. मनिषा अनिल भोसले, जेष्ठ नेते बाबुराव पाटील, सुभाष चौगुले, ग्रामपंचायत सदस्य, जेष्ठ शिवसैनिक व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
उपोषण यशस्वी होण्यासाठी जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, ग्रामपंचायत, महसूल व बांधकाम विभागाचे अधिकारी, तसेच गावातील विविध नेते, कार्यकर्ते व नागरिकांनी मोलाची भूमिका बजावली. उपोषणकर्त्यांनी सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.
जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या शिष्टाईमुळे इंगळीतील आमरण उपोषणाची यशस्वी समाप्ती
|