बातम्या
गोकुळच्या पहिल्याच बैठकीत दूध दरवाढीचा मुद्दा; महाविकास आघाडीचा राजेश पाटलांना आग्रह!
By nisha patil - 11/14/2026 3:07:33 PM
Share This News:
गोकुळच्या पहिल्याच बैठकीत दूध दरवाढीचा मुद्दा; महाविकास आघाडीचा राजेश पाटलांना आग्रह!
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी राजेश पाटील यांची निवड झाल्यानंतर संचालक मंडळाची पहिलीच महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडत आहे. अध्यक्ष राजेश पाटील यांनी बोलावलेल्या या बैठकीला महाविकास आघाडी आणि महायुतीचे संचालक उपस्थित असून, पहिल्याच बैठकीत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दूध दरवाढीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
बैठकीच्या सुरुवातीलाच महाविकास आघाडीच्या संचालकांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध दरवाढ देण्याची मागणी केली. गोकुळच्या दूध विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाणार असेल, तर त्याचा लाभ दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही मिळाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे या बैठकीतील दूध दरवाढीचा मुद्दा विशेष लक्षवेधी ठरत आहे.
दरम्यान, गोकुळमधील राजकीय सत्तासंघर्षानंतर पार पडणारी ही पहिलीच बैठक असल्याने याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बैठकीला महायुती आणि महाविकास आघाडीच्या संचालकांसह शासननियुक्त चार संचालकही उपस्थित आहेत. दूध दरवाढीबरोबरच सध्या निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, जनावरांसाठी चारा टंचाई, पशुखाद्याचे दर, दूध संकलनात वाढ करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि संघाच्या आगामी धोरणांवरही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, गोकुळच्या दूध विक्री दरात वाढ केल्यास मुंबई-पुण्यासह अन्य शहरांतील ग्राहकांवर त्याचा आर्थिक परिणाम होऊ शकतो. मात्र, विक्री दरात वाढ करताना दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हातातही अधिक पैसे मिळाले पाहिजेत, अशी आग्रही भूमिका महाविकास आघाडीच्या संचालकांनी घेतली आहे.
त्यामुळे अध्यक्ष राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या पहिल्याच बैठकीत दूध दरवाढीबाबत काय निर्णय होतो, उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का आणि गोकुळच्या आगामी धोरणांची दिशा काय असणार, याकडे दूध उत्पादकांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
गोकुळच्या पहिल्याच बैठकीत दूध दरवाढीचा मुद्दा; महाविकास आघाडीचा राजेश पाटलांना आग्रह!
|