बातम्या

गोडसाखरच्या कर्मचाऱ्यांच्या थकीत देण्यांचा प्रश्न निघाला निकाली   

The issue of outstanding dues for Godsakhar employees has been resolved


By Administrator - 4/7/2026 7:21:03 PM
Share This News:



गोडसाखरच्या कर्मचाऱ्यांच्या थकीत देण्यांचा प्रश्न निघाला निकाली   
         
युनियनकडून मंत्री हसन मुश्रीफ यांचा कृतज्ञतापर सत्कार 
                 
पावणेआठ कोटींची थकीत देणी भागविल्यामुळे कर्मचाऱ्यांत समाधान 

        
गडहिंग्लज, दि. ४:  गोडसाखर म्हणजेच आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या थकीत देण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे. याबद्दल साखर कारखाना कर्मचारी युनियनच्यावतीने मंत्री हसन मुश्रीफ यांचा कृतज्ञतापर सत्कार झाला. थकीत भविष्य निर्वाह निधीपोटी साडेपाच कोटी, २५ टक्के प्रमाणे ग्रॅच्युईटी दीड कोटी, हंगामी कर्मचाऱ्यांची रिटेन्शन ६५ लाख, असे एकूण पावणे आठ कोटी रुपये अदा झाल्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.    
                

 

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना अनेक वर्ष कर्जाच्या खाईतून बाहेर पडायला तयार नव्हता. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मतदारसंघामधील अनेक गावे, कार्यकर्ते आणि कर्मचारी या कारखान्याशी जोडलेले असल्याने कारखान्याला अडचणीतून बाहेर काढणे गरजेचे होते.  संचालक मंडळाने प्रकाश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तो 'ब्रिक्स' (Bricks) कंपनीला चालवण्यासाठी देण्याचा निर्णय झाला. या कंपनीने आठ वर्षे कारखाना चांगला चालवला. एफआरपी (FRP) वेळेवर दिली आणि कामगारांची देणी दिली. तोडणी वाहतुकही व्यवस्थित दिली.  आठ वर्षांत झालेला सुमारे १०० कोटींचा तोटा कंपनीला झाला. काही राजकीय लोकांच्या तक्रारीमुळे आणि कामगारांच्या अडचणीमुळे दोन वर्ष आधीच त्यांना कारखाना सोडावा लागला.
         
त्यानंतर डॉ. प्रकाश शाहपूरकरांच्या नेतृत्वाखाली आपण पॅनेल उभे केले आणि हे पॅनेल प्रचंड मतांनी निवडून आले. पुढे त्यांनी राजीनामा दिल्यानंतर, सध्या भाई प्रकाश पताडे (चेअरमन) आणि प्रकाश चव्हाण (व्हाईस चेअरमन) म्हणून कारखान्याचे काम पाहत आहेत.
                    
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील गिजवणीकर म्हणाले,  हसन मुश्रीफ साहेबांनी कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रॉव्हिडंट फंड (PF) आणि ग्रॅच्युइटीचा प्रश्न मार्गी लावला. कामगारांच्यादृष्टीने हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. यापूर्वी कारखाना अत्यंत बिकट परिस्थितीतून जात असताना मंत्री श्री. मुश्रीफ साहेबांनी येथे मोठा चमत्कार घडवला आणि नेहमी कामगारांच्या हिताची तळमळ दाखवत त्यांचे प्रश्न सोडवले.
           
केडीसीसी बँकेचे सहकार्य.......!
श्री. मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने नियम बाजूला ठेवून कारखान्याला कर्ज देऊन मदत केली. परंतु, गेली दोन वर्षे हंगाम चांगला न गेल्यामुळे तोट्यात वाढ झाली आहे. साखरेचे दर, वाढती एफआरपी, तोडणी-वाहतुकीची बिले आणि कामगारांचे पगार यामुळे कारखाना सध्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. बँकेचा चेअरमन म्हणून या कारखान्याची मागील १०-१५ वर्षांची श्वेतपत्रिका (White Paper) काढण्यास आपण तयार आहोत. या कारखान्याचा गळीत हंगामही चांगला झालेला नाही आणि कर्जही कमी झालेले नाही.
           
एकजुटीने प्रामाणिक प्रयत्न करा........!
कामगारांना आवाहन करताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले,  जरी तुम्ही माझा सत्कार केला असला तरी जोपर्यंत आगामी गाळप हंगाम (Season) उत्तम प्रकारे पार पडत नाही, तोपर्यंत कारखान्यावरील कर्जाचा बोजा कमी होणार नाही आणि हे संकट कायम राहील. हा कारखाना तुम्हाला भाकरी देणारी आणि तुमचे जीवनमान सुधारणारी संस्था आहे. तुमच्या मुलाबाळांचे शिक्षण आणि कुटुंब या कारखान्यावर अवलंबून आहे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे.
.............


गोडसाखरच्या कर्मचाऱ्यांच्या थकीत देण्यांचा प्रश्न निघाला निकाली   
Total Views: 11