बातम्या
*बाप्पाच्या आगमनामुळे आजऱ्यातील बाजारपेठ सजली
By nisha patil - 12/9/2026 9:11:41 PM
Share This News:
*बाप्पाच्या आगमनामुळे आजऱ्यातील बाजारपेठ सजली
आजरा(हसन तकीलदार):-गणेशोत्सवाच्या आगमनामुळे आजऱ्यातील बाजारपेठेमध्ये नागरिक आणि भावीकांची गर्दी उसळली असून बाप्पाच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. बाजारपेठेमध्ये सजावटीच्या साहित्यामुळे वातावरण अगदी उजळून निघाले आहे. सगळीकडे आनंदी आणि उत्साहाचे वातावरण आहे.
बाप्पाच्या मूर्ती पूजेचे साहित्य, आकर्षक फुले आणि रंगीबेरंगी मनमोहक सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची व भक्तांची आजऱ्याच्या बाजारपेठेत मोठी गर्दी दिसत आहे. स्टॉलवर लावण्यात आलेल्या आरत्या आणि भक्ती गीतामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय व मंगलमय झाले आहे. कुंभारवाड्यामध्ये मूर्तिकारांची लगबग सुरु असून नोंदणी केलेल्या मूर्ती वेळेवर रवाना होत आहेत. एकंदरीत घरोघरी बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागून राहिली आहे.
इलेक्ट्रिक दुकानात वेगवेगळ्या दिव्यांची रोषणाई करून गिऱ्हाईकांना आकर्षित केले जात आहे. हा उत्साह आणि जल्लोष पुढील दहा बारा दिवस असाच कायम रहाणार आहे. संपूर्ण आजरा बाप्पाच्या भक्तीत तल्लीन होण्यासाठी सज्ज झाला आहे.
खरेदीसाठी आलेल्या गणेशभक्तांना गणेशोत्सव सुरु झाल्याची झलक पूर्ण बाजारपेठेत अनुभवायला मिळत आहे. रंगीबेरंगी फुलांच्या माळा,नवनवीन आकाराच्या -रंगाच्या विद्युत दिव्यांच्या माळा, फटाके, सुरसुरे, आकर्षक साहित्य मांडणी करून ग्राहकांना आकर्षित केले जात आहे.
*बाप्पाच्या आगमनामुळे आजऱ्यातील बाजारपेठ सजली
|