राजकीय
आजरा नगरपंचायतीची मासिक सभा अगदी खेळीमेळीत संपन्न
By nisha patil - 4/30/2026 11:38:13 AM
Share This News:
आजरा नगरपंचायतीची मासिक सभा अगदी खेळीमेळीत संपन्न
आजरा(हसन तकीलदार) - आजरा नगरपंचायतीची मासिक सभा नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांचे अध्यक्षतेखाली व उपनगराध्यक्षा पूजा डोंगरे, मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांच्या उपस्थितीत अगदी खेळीमेळीत आणि शांततेत पार पडली. विविध विषयांचे वाचन निहाल नायकवाडी यांनी केले. नगरपंचायतीच्या कै. काशिनाथअण्णा चराटी सभागृहात विविध विषयावर सकारात्मक चर्चा करीत सभा संपन्न झाली.
आजची सभा ही अगदी खेळीमेळीत आणि शांततेत सकारात्मक निर्णय घेत संपन्न झाली हे विशेष. मागील सभेचे इतिवृत्तांत वाचून कायम करणे, मिळकत विभागाच्या गाळे भाडेवाढ रद्द होणेबाबत प्राप्त झालेल्या सर्व गाळेधारकांच्या अर्जाबाबत विचारविनिमय, वृक्षप्राधिकरण विभागांतर्गत आजरा नगरपंचायतीकरिता वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना करणेबाबत, आरोग्य विभागअंतर्गत भटक्या प्राण्यासाठी एबीसी केंद्र व निवारा केंद्र उभारणीबाबत, शहर समन्वयक मानधन याबाबत, आजरा शहरामध्ये विविध ठिकाणी रस्ते व इमारतीस अडथळा होणारे विद्युत खांब शिफ्ट करणेबाबत, नाईक गल्लीत सौरदिवे लावणे बाबत, आजरा नगरपंचायत जलशुद्धिकरण केंद्र गांधीनगर येथील जलकुंभ शेजारी क्रीडा संकुलाच्या बाजूला संरक्षक भिंत बांधणेबाबत तसेच केंद्रशासन पुरस्कृत 2•0 अभियानांतर्गत नवरेकर कॉलनी येथील खुल्या जागेत बगीचा विकसित करणेकरिता प्रकल्प किंमतीच्या 5%स्वहिस्सा 15 वा वित्तआयोग, नगरनिधी व इतर निधीतून भरणेबाबत विचार करणे इत्यादी विषयावर सकारात्मक चर्चा झाली.
यामध्ये प्रामुख्याने शहर समन्वयक पदासाठी 45,000/-₹ इतका पगार देऊन पद ठेवणे परवडण्यासारखे नसल्याने सदरच्या पदावर कर्मचारी ठेवणे गरजेचे नाही. असे मत नगरसेवक परेश पोतदार यांनी मांडले. नाईक गल्लीत ज्याठिकाणी सार्वजनिक विद्युत पुरवठा करून दिवे लावता येत नाही अशा ठिकाणी सौर दिवे बसवण्याबाबत तसेच सलाम काकतिकर ते रियाज नसरदी यांच्या घरापर्यंत पाईप टाकून मोरी करण्याबाबत नगरसेवक असिफ सोनेखान यांनी मागणी केली. 1 मे पासून जनगणना 2027 नगरपंचायतमार्फत सुरु होणार असलेबाबत सांगण्यात आले व माहिती देण्यात आली. नवरेकर कॉलनीतील अतिक्रमणे काढा. कोणाचेही नाव सांगत अडवण्याचा प्रयत्न केला जात असेल तर कुणाचेही ऐकू नका अशी सूचना नगरसेवक बामणे भाऊजी यांनी मांडली. सद्या सौरदिवे बंद अवस्थेत आहेत, ठेकेदाराने देखभाल दुरुस्ती केलेली नाही त्यामुळे त्यांचे डिपॉझिट रद्द करा अशीही मागणी करण्यात आली. बांधकाम कामगारांच्या लालबावट्याचे काम सद्या बंद आहे त्यामुळे कामगारांना त्रास सहन करावा लागत आहे. कामे वेळेत होईनात त्यामुळे कुणा एकाकडे चार्ज देऊन कामांची निर्गत व्हावी तसेच गाळे धारकांच्या भाडेवाढीबाबत फेर विचार व्हावा अशा सूचना नगरसेवक निसार लाडजी यांनी मांडल्या. शहरातील तिसरा डोळा बंद अवस्थेत आहे. सिसिटीव्ही कॅमेरे पूर्णपणे बंद आहेत तरीसुद्धा बिल आदा झाले आहे. शहरात गाड्यांच्या काचा फोडणे किंवा इतर दुषकृत्ये होत आहेत त्यामुळे ही सिसिटीव्ही कॅमेरे यंत्रणा कार्यरत राहणे गरजेचे आहे. सिसिटीव्ही कॅमेरे सुरु करण्याची मागणी नगरसेविका रेश्मा बुडडेखान यांनी केली. प्रशासनाला कल्पना न देता परस्पर मनमानी पद्धतीने एकापेक्षा जास्त नळ कनेक्शन घेतली असून प्रभागनिहाय सर्वे करून तातडीने जादा असलेली व बेकायदेशीर नळ कनेक्शन्स बंद करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी परेश पोतदार यांनी केली.केलेल्या कामांची बिले वेळेत देण्याबाबत नगरसेविका निशात चांद यांनी सांगितले. क्रीडा संकुल खुले करण्याची मागणी नगरसेवक अनिकेत चराटी यांनी केली.अंगणवाड्यांची दुरुस्ती करणेबाबत तसेच मागील तीन महिन्यापासून गटार सफाईसाठी रोजंदारी मजूर घेणेबाबत सूचना मांडल्या असताना अजूनपर्यंत यावर कार्यवाही का झालेली नाही? महिला स्वच्छतागृहाची मागणी करूनही अजुनपर्यंत यावर निर्णय का झालेला नाही? भाजी मार्केटजवळ महिलासाठी लवकरात लवकर स्वच्छतागृह तयार करणेबाबत नगरसेविका डॉ. स्मिता कुंभार यांनी सूचना मांडली. त्याचप्रमाणे सद्या उन्हाळ्याचे व सुट्टीचे दिवस आहेत. सद्या सोडत असलेले पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे जास्त वेळ म्हणजे किमान पंधरा ते विस मिनिटे जास्त पाणी सोडण्यासाठी सूचना मांडण्यात आली.जास्तीत जास्त निधी आणून ज्या नगरसेवकांच्या वॉर्डात कामे शिल्लक आहेत त्यांनी तशा सूचना मांडा. पालकमंत्र्यांना भेटून अधिक निधी कसा आणता येईल यासाठी प्रयत्न करूया आणि प्रत्येक वॉर्डातील कामे पूर्ण करूया. त्याचप्रमाणे नवीन तीन घंटा गाड्या खरेदी करूया, तहसील व पोलीस स्टेशनची जुनी इमारत ताब्यात घेऊन नगरपंचायत तेथे नेण्याबाबतचे मत नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांनी मांडले. यावेळी नगरसेवक, नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आजरा नगरपंचायतीची मासिक सभा अगदी खेळीमेळीत संपन्न
|