शैक्षणिक

नवभारताचे उदात्त स्वप्न हा एन. डी. सरांचा ध्यास : कुलकर्णी

The noble dream of a new India is the obsession of N D Sir Kulkarni


By nisha patil - 1/16/2026 6:37:05 PM
Share This News:



कोल्हापूर: — महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेतील कृतिशील विचारांचा ठसा उमटवणारे प्रा. एन. डी. पाटील हे केवळ विचारवंत नव्हते, तर समाजपरिवर्तनासाठी रस्त्यावर उतरलेले लढवय्ये नेते होते, असे प्रतिपादन प्रसाद कुलकर्णी यांनी केले. शिवाजी विद्यापीठातील डॉ. एन. डी. पाटील लोकचळवळ अध्यासनतर्फे आयोजित स्मृतिदिनानिमित्त ‘प्रा. एन. डी. पाटील : विचारविश्व आणि प्रबोधन’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे होते.

कुलकर्णी म्हणाले, सामान्य माणसांच्या प्रश्नांची सोडवणूक हेच एन. डी. सरांच्या जीवनकार्याचे केंद्र होते. समाजातील निद्रिस्तांना जागे करणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि सत्याचा आग्रह धरणे हीच त्यांची प्रबोधनाची व्याख्या होती. मूल्याधिष्ठित राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी हस्तक्षेपाचे राजकारण केले. नवभारताचे उदात्त स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर अथक प्रयत्न केले. सामाजिक बांधिलकी ही केवळ त्यांच्या भाषणांत नव्हती, तर ती त्यांच्या कृतीतून सातत्याने दिसून आली. गेल्या सहा दशकांतील सामाजिक व राजकीय चळवळींचा इतिहास लिहिला, तर एन. डी. सरांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल, असेही त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. शिंदे म्हणाले, तत्त्वांशी तडजोड न करता संवाद साधणे आणि समाजहिताची उभारणी करणे हा एन. डी. सरांचा सर्वात मोठा गुण होता. विधायक कार्यासाठी ते सदैव पुढाकार घेत. महाराष्ट्राच्या प्रबोधन चळवळीत त्यांचे योगदान अविस्मरणीय राहील.

यावेळी एन. डी. पाटील यांच्या स्नुषा संगीता पाटील यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. मराठी विभागप्रमुख प्रा. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रा. नंदकुमार मोरे, डॉ. बळवंत मगदूम, डॉ. पी. टी. सावंत, डॉ. दीपक भादले, मतीन शेख, सोनाली जाधव यांच्यासह संशोधक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


नवभारताचे उदात्त स्वप्न हा एन. डी. सरांचा ध्यास : कुलकर्णी
Total Views: 26