बातम्या

महात्मा जोतिबा फुले योजनेचा गोर गरिबांनी लाभ घावा : संतोष कुलकर्णी

The poorest of the poor should benefit from Mahatma Jyotiba Phule Scheme


By nisha patil - 12/9/2025 4:28:34 PM
Share This News:



महात्मा जोतिबा फुले योजनेचा गोर गरिबांनी लाभ घावा : संतोष कुलकर्णी 

कोल्हापूर – कोल्हापूर शहरातील वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटल येथे भटके विमुक्त विकास परिषद कोल्हापूर शहर आणि महालक्ष्मी हेल्थ फाउंडेशन यांच्याद्वारे एक संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत कोल्हापूर शहर व परिसरातील विविध भटके व विमुक्त समाजाच्या वस्तीप्रमुखांनी सहभाग घेतला. समाजातील आरोग्यविषयक समस्यांकडे लक्ष वेधून त्यावर उपाययोजना आखण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी महालक्ष्मी हेल्थ फाउंडेशनचे श्री. संतोष कुलकर्णी यांनी उपस्थितांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांची माहिती दिली. विशेषतः महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या योजनांच्या माध्यमातून गरीब व गरजू रुग्णांना मोफत उपचार व आरोग्य सुविधा कशा मिळू शकतात, याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

श्री. कुलकर्णी यांनी नमूद केले की, महालक्ष्मी हेल्थ फाउंडेशनचं वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटल हे १९८७ साली सुरू झालेलं कोल्हापूरमधील पहिले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. ते स्थानिकांमध्ये "धाकटा दवाखाना" म्हणून प्रसिद्ध आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या हॉस्पिटलने सामान्य नागरिकांना कमी खर्चात आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा पुरवली आहे.

अद्यापही अनेक भटके व विमुक्त समाजाचे घटक वैद्यकीय सुविधांपासून वंचित आहेत, ही गंभीर बाब असून, त्यांना आरोग्यदृष्ट्या सशक्त बनवण्यासाठी शासकीय योजनांबरोबरच स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि आरोग्यदूतांची भूमिका महत्त्वाची आहे. या समाज घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध आरोग्य शिबिरे, तपासणी मोहीम, जनजागृती कार्यक्रम आणि मोफत औषधवाटप अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत समाजातील महिलांचे आरोग्य, बालकांचे लसीकरण, कुपोषण, रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग यांसारख्या आजारांविषयीही चर्चा करण्यात आली. विशेषतः महिलांच्या आरोग्यविषयक अडचणी लक्षात घेता, महिला आरोग्य शिबिरे आणि जनजागृती मोहिमांवर भर देण्यात येणार आहे.

या बैठकीस पश्चिम महाराष्ट्र विभाग संयोजक श्री. अशोक लाखे, शहर संयोजक स्वप्नील निपाणीकर, करवीर तालुका संयोजक कृष्णा मछले, डोंबारी समाज प्रमुख जयवंत पाटील, डवरी समाज प्रमुख महादेव शिंदे, तसेच महिला आघाडी प्रमुख नीता वालावलकर हे मान्यवर उपस्थित होते.

वस्तीप्रमुखांनी आपल्या भागातील आरोग्यसंबंधी अडचणी, उपलब्ध सुविधांची कमतरता आणि जनजागृतीच्या अभावाबद्दल चिंता व्यक्त केली. यावर प्रतिसाद देताना महालक्ष्मी हेल्थ फाउंडेशनने अशा वस्त्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन सेवा देण्याची तयारी दर्शवली.

या उपक्रमाच्या माध्यमातून भटके व विमुक्त समाजाच्या आरोग्य हक्कांची जाणीव निर्माण होणार असून, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि आरोग्य सशक्ततेकडे वाटचाल करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.

बैठकीच्या शेवटी समाजातील आरोग्यविषयक प्रश्नांवर सातत्याने काम करण्याचा आणि सहकार्याने पुढे जाण्याचा संकल्प सर्व सहभागी सदस्यांनी केला.


महात्मा जोतिबा फुले योजनेचा गोर गरिबांनी लाभ घावा : संतोष कुलकर्णी
Total Views: 80