बातम्या

जनतेला वेठीस धरणार नाही, थेट साखर कारखानेच ठप्प करणार; ऊसदर आंदोलनाची रणनीती बदलली!"

The public will not be held to ransom


By nisha patil - 10/14/2026 6:04:37 PM
Share This News:



जनतेला वेठीस धरणार नाही, थेट साखर कारखानेच ठप्प करणार; ऊसदर आंदोलनाची रणनीती बदलली!"

प्रतिनिधी अजित बोडके स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेले आंदोलन स्थगित केलेले नसल्याचे स्पष्ट केले असून आंदोलनाची रणनीती बदलल्याची घोषणा केली आहे. महामार्गावरील आंदोलनामुळे सर्वसामान्य जनता आणि प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याने लोकहित विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. आता आंदोलक रस्त्यावर उतरून चक्काजाम न करता थेट साखर कारखान्यांचे गाळप बंद पाडतील आणि कारखानदारांना लक्ष्य करतील, असा आक्रमक इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
 

या नव्या रणनीतीनुसार साखर कारखान्यांमधून बाहेर पडणारी साखरेची वाहतूक आणि ऊस घेऊन जाणारी वाहने पूर्णपणे रोखली जाणार आहेत. राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत त्यांनी स्वतःहून आपला ऊस कारखान्यांना गाळपासाठी पाठवू नये. चालू गळीत हंगामातील उसाला पहिली उचल म्हणून प्रतिटन ५,००० ते ५,५०० रुपये दर मिळाला पाहिजे, या मागणीवर संघटना अद्यापही ठाम आहे. दिल्लीतील केंद्र सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यावर पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन अद्यापही सुरू आहे. केंद्र सरकारने लेखी निर्णय दिल्याशिवाय सीमाभागातून माघार घेणार नाही, असे स्पष्ट करत राजू शेट्टी यांनी आता थेट कारखान्यांच्या वेशीवर लढाई लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

 


जनतेला वेठीस धरणार नाही, थेट साखर कारखानेच ठप्प करणार; ऊसदर आंदोलनाची रणनीती बदलली!"
Total Views: 21