बातम्या

सैनिक टाकळी एमआयडीसीचा अहवाल अखेर आंदोलकांच्या हाती!

The report of Sainik Takli MIDC is finally in the hands of the protesters


By nisha patil - 11/23/2026 11:13:16 PM
Share This News:



सैनिक टाकळी एमआयडीसीचा अहवाल अखेर आंदोलकांच्या हाती!
 

गायरानाच्या ५ टक्के मर्यादेचे उल्लंघन; ग्रामसभेचा ठरावही कायदेशीरदृष्ट्या अवैध असल्याचे अहवालात स्पष्ट
 

शासन निर्णय तात्काळ रद्द करा; अन्यथा थेट उद्योग मंत्रालयावर धडक देणार – दीपक पाटील
 

कोल्हापूर (प्रतिनिधी : आचिन हेरवाडे)प्रस्तावित सैनिक टाकळी एमआयडीसीच्या विरोधातील आंदोलनाला आता महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे. एमआयडीसीसंदर्भात प्रशासनाने तयार केलेला अहवाल अखेर आंदोलकांच्या हाती आला आहे. हा अहवाल मिळावा, या मागणीसाठी आंदोलकांनी आज जिल्हा प्रशासनासमोर ठिय्या आंदोलन केले. आंदोलकांनी ठाम भूमिका घेतल्यानंतर दुपारनंतर प्रशासनाने सदर अहवाल आंदोलकांच्या ताब्यात दिला.
 

या अहवालातील निष्कर्षांमुळे प्रस्तावित सैनिक टाकळी एमआयडीसीच्या प्रक्रियेवर गंभीर कायदेशीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. एमआयडीसीसाठी गायरान जमीन दिल्यानंतर गावासाठी केवळ १७.३३ हेक्टर गायरान जमीन शिल्लक राहते. त्यामुळे गावाच्या एकूण महसुली क्षेत्राच्या पाच टक्के गायरान जमीन शिल्लक राहत नसल्याचे अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
तसेच, प्रस्तावित एमआयडीसीच्या प्रक्रियेसाठी वापरण्यात आलेला ग्रामसभेचा ठराव ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदींना धरून नसल्याचे आणि त्यामुळे सदर ठराव कायदेशीरदृष्ट्या वैध नसल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे गायरान जमिनीच्या पाच टक्के मर्यादेचा मुद्दा आणि ग्रामसभेच्या ठरावाची वैधता या दोन्ही बाबी आता निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

 

अहवालामुळे एमआयडीसी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह!
ग्रामसभेचा वैध ठराव नसताना आणि गायरान जमिनीच्या पाच टक्के मर्यादेचा प्रश्न कायम असताना एमआयडीसीची प्रक्रिया पुढे रेटणे अन्यायकारक असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. प्रशासनाच्या अहवालातील निष्कर्षांची दखल घेऊन उद्योग मंत्रालयाने प्रस्तावित सैनिक टाकळी एमआयडीसीचा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, तसेच गायरान जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी सैनिक टाकळी पंचक्रोशीतील माजी सैनिक, शेतकरी, शेतमजूर आणि पूरग्रस्त नागरिकांनी केली आहे.

 

याप्रकरणी शासनाने अहवालातील निष्कर्षांकडे दुर्लक्ष करून एमआयडीसी लादण्याचा प्रयत्न केल्यास थेट उद्योग मंत्रालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी दिला.
 

आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार
या आंदोलनाला सैनिक टाकळी पंचक्रोशीतील माजी सैनिक, शेतकरी, शेतमजूर आणि पूरग्रस्त नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असून, प्रशासनाच्या अहवालामुळे आंदोलनाला नवी ताकद मिळाल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली. शासनाने आता अहवालातील बाबींची गांभीर्याने दखल घेऊन एमआयडीसीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली.

 

यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, कॅप्टन विजय गायकवाड, कॅप्टन प्रकाश खोत, हनुमंत पाटील, नवनाथ पाटील, अमर पाटील, अमर वासनकर, राजेश पाटील, विजय पाटील, डी. डी. पाटील, राजेश कदम, शामराव पाटील, सुरेश भोसले, दत्तात्रय पाटील, संदीप पाटील, संजय पाटील, सुनील कानिटकर, किरण बिरणगे, रणजीत पाटील, श्रीधर भोसले, किरण माने, काकासो पाटील यांच्यासह सैनिक टाकळी पंचक्रोशीतील बहुसंख्य माजी सैनिक, शेतकरी, शेतमजूर व पूरग्रस्त नागरिक उपस्थित होते.


सैनिक टाकळी एमआयडीसीचा अहवाल अखेर आंदोलकांच्या हाती!
Total Views: 4